नांदेड(प्रतिनिधी)-शेत जमीनीची मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्री करण्यासाठी मुद्रांक शुल्कासह 1 लाख 99 हजार रुपयांची मागणी करून त्यात तडजोडीनंतर 4 हजार रुपये कमी करून 1 लाख 95 हजार रुपये स्विकारणाऱ्या हदगाव येथील उपनिबंधक श्रेणी-1 आणि दोन खाजगी व्यक्ती मुद्रांक विक्रेते अशा तिघांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
दि.12 जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार प्राप्त झाली की, मौजे हदगाव येथे गट क्रमांक 256/2 मध्ये 20 गुंटे शेत जमीनी तक्रारदाराने खरेदी केली. उपनिबंधक कार्यालय हदगाव येथे जावून दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यानी आपल्यासोबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पंचपण नेले होते. तेंव्हा उत्तरवार यांनी रजिस्ट्री करून घेण्यासाठी 1 लाख 99 हजार रुपये मागितले. त्यात नोंदणी मुद्रांक फि आणि लाच अशा दोन्ही रक्कमांचा समावेश होता. तेथे तडजोड झाली. तडजोडीत उपनिबंधक उत्तरवार यांनी 4 हजार रुपये कमी केले आणि 1 लाख 95 हजार रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक विक्रेता समीउल्ला यांना देण्यास सांगितले. ही रक्कम स्विकारुन समी उल्लाने शेख अबुबकर याच्या ताब्यात दिली. यामध्ये नोंदणीसाठी, रजिस्ट्रीसाठी लागणाऱ्या 1 लाख 13 हजार 400 रुपयांची पावती आणि 81 हजार 600 रुपये लाचेची रक्कम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली. या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे हदगाव येथे दुय्यम निबंधक श्रेणी-1, उपनिबंधक कार्यालय हदगाव(वर्ग-3 ) चे दुय्यम निबंधक बालाजी शंकरराव उत्तरवार, मुद्रांक विक्रेते समीउल्ला अजमत उल्ला शेख उर्फ समी, शेख अबुबकर करीम सिद्दीकी उर्फ बाबू या तिघांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक प्रिती जाधव अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कार्यवाही पुर्ण केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणीही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्या व्यक्तीने दुरध्वनी क्रमांक 02462-253512 किंवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर या संदर्भाची माहिती द्यावी.