नांदेड(प्रतिनिधी)-शहरालगत असलेल्या मोर चौक ते पावडेवाडी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यामुळे अनेक अपघात घडत असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहिम राबवली होती. या मोहिमेत जवळपास साडेतीन हजार नागरिकांनी स्वाक्षरी केली असून, नागरिकांच्या स्वाक्षर्यांचे पत्र नागरी कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
मोर चौक ते पावडीवाडी रस्त्याच्या कामास दहा वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. परंतु हे काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे रस्त्याच्या कामाचा फलक देखील गायब करण्यात आला आहे. मोर चौक ते पावडेवाडी हा मुख्य दळणवळणाचा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावरुन जाणार्या महिला, कर्मचारी, मुले, वयोवृध्द नागरिक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना मणक्याचे आजार जडले आहेत. तर दुसरीकडे थातूरमातूर कामे करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी नागरीक कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून रस्त्याच्या ुरुस्तीसाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास तीन ते साडेतीन हजार नागरिकांनी स्वाक्षरी करुन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन नागरिक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.दिलीप शिंदे, उपाध्यक्ष वसंत कर्हाळे, नंदकुमार बनसोडे, सचिव विजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष संकेत जमदाडे, कोषाध्यक्ष किरण नाईक, बळीराम एंगडे, संतोष धानोरकर, एस.व्ही.गंजेवार यांनी आज जिल्हाधिकार्यांना दिले.