नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत धुरंधर तपासिक अंमलदार असतांना एक कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांना पोलीस कोठडी तर दिलीच नाही उलट अनेक ताशेरे ओढत प्रकरणातील आरोपीनां जामीन दिला आहे. म्हणजे प्रकरणातील पोलिसांचे सादरीकरण किती उत्कृष्ट असेल याची कल्पना केलेलीच बरी.हा आदेश मुख्य मुख्य न्यायदंडाधिकारी किती जैन देसरडा यांनी दिला आहे.
समीउल्ला खान सैफुल्ला खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बरकत कॉम्प्लेक्स ते ग्यानमाता स्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेगवेगळ्या तीन आखीव पत्रिकेतील जागा परभणी येथील मोहम्मद जाफर अब्दुल रजाक, अब्दुल गफार अब्दुल रजाक दोघे रा.परभणी आणि अजमतउल्ला खान नसरुल्ला खान पठाण रा.श्रीनगर नांदेड या तिघांकडून खरेदी करण्याचे ठरले. त्यासाठी त्यांना दोन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 1 कोटी रुपये देण्यात आले. खरेदी करण्याच्या जागा शेत सर्व्हे नंबर 125/3 मधील 81 आर पैकी 17.77 आर ज्याचा सीटी सर्व्हे क्रमांक 11720 आहे. त्यामधील 10 हजार 754 चौरस फुट जागा, सिी सर्व्हे क्रमांक 11724 मधील 8606 चौरस फुट जागा अशी एकूण 16 हजार 960 चौरस फुट जमीन 750 रुपये प्रति चौरस फुट दराने घेण्याचे ठरले होते. त्याची एकूण किंमत 1 कोटी 27 लाख 20 हजार रुपये एवढी होते. दिलेल्या एक कोटी रुपयांचे वेगवेगळे मुद्रांक कागद लिहुन घेण्यात आले. इतर सर्व कायदेशीर बाबी त्या मुद्रांक कागदात लिहिण्यात आल्या.
28 एप्रिल 2022 रोजी खरेदी खत करण्याचे ठरले होते. पण आखीव पत्रिकेत काही दुरुस्ती होती म्हणून त्यावेळी ते खरेदी खत करता आले नाही. आम्ही पुन्हा आपल्या खरेदी खताचा पाठपुरावा करू लागलो तेंव्हा तिघांनी तुमचे घेतलेले 1 कोटी रुपये परत दिले आहेत असे सांगून आमची फसवणूक केली. त्यानंतर आम्ही पोलीस अधिक्षक कार्यालयात अर्ज दिला तेंव्हा 10 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरच्या रस्त्यावर तुमचे तंगडे तोडतो, जिवे मारुन टाकतो अशा धमक्या दिल्या. या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद जाफर अब्दुल रजाक, अब्दुल गफार अब्दुल रजाक दोघे रा.परभणी आणि अजमतउल्ला खान नसरुल्ला खान पठाण रा.श्रीनगर नांदेड या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंड सीतेची कलमे ४२०,४०६ जोडण्यात आली होती.या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस उप निरिक्षक नागोराव कुंडगीर यांच्याकडे देण्यात आला.नागोराव कुंडगीर हे अत्यंत चाणाक्ष,धूर्त,बुद्धिवान,धाडसी पोलीस उप निरीक्षक आहेत. पोलीसांनी तिघांना अटक केली. आज दि.14 जून रोजी त्या तिघांना न्यायालयात हजर करून पोलीस सात दिवस कोठडी मागण्यात आली होती.
या उलट आरोपींच्यावतीने ऍड.सय्यद अरिबोद्दीन यांनी सादरीकरण करतांना या गुन्ह्यातील सौदा चिट्ठी खोटी नाही,सर्व प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयांचे अर्नेशकुमार आणि सत्येंद्रसिंघ अँटेल या निकालांमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही.असे अनेक मुद्दे मांडले.न्या देसरडा यांनी या गुन्ह्यात कलम ४२० जोडलेच जाऊ शकत नाही,असे सांगत पोलीस कोठडी नाकारली. सोबतच जामीन अर्ज सुद्धा मंजूर केला आहे.अर्थातच अत्यंत धुरंधर पोलीस उप निरीक्षक तपासिक अंमलदार असतांना सुद्धा कायदयातील ुका उत्तम प्रकारे जोडून सादर न केल्याने या १ कोटी रुपयांच्या गुन्ह्याची हवाच निघून गेली आहे.