मयत अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे जनतेला आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील नखेगाव शिवारात सापडलेल्या अनोळखी मयत महिलेबद्दल पोस्टमार्टम अहवालात ती महिला गरोदर होती असे सिध्द झाले आहे. तिचा गळाकापुन, कपड्याने गळा आवळून तिच्यासह पोटातील अपत्य सुध्दा मारुन टाकले आहे. माहुर पोलीसांनी या संदर्भाने खूनाचा, पुरावा नष्ट करणे, गर्भाचा नाश करणे या सदरांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
दि.5 जून रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास नखेगाव शिवारातील निलाबाई तुळशीराम राठोड यांच्या शेतात एक अनोळखी जळालेल्या आवस्थेतील महिलेचे प्रेत सापडले. या संदर्भाने त्यावेळी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.त्यानंतर प्रेताचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानुसार तिचा गळा चिरलेला होता, तिचा गळा आवळलेला होता आणि ती गरोदर होती. म्हणजे अपत्य सुध्दा मारण्यात आले आहे. आकस्मात मृत्यूचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संगमनाथ माधवराव परगेवार यांनी दिलेा क्ररीनंतर माहुर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 315, 201 नुसार गुन्हा क्रमांक 65/2024 दाखल केला असून खूनाच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
माहुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी महिलेने परिधान केलेला पेहराव ज्यामध्ये शिल्लक राहिलेल्या तिच्या हातातील हिरव्या बांगड्या, तिच्या शरिरावर सापडलेले बेन्टेक्सचे दागिणे आणि तिची उंची 5 फुट पेक्षा जास्त आणि ती महिला गरोदर आहे एवढ्याच बाबीवरून कोणी त्या महिलेला ओळखत असेल तर त्या संदर्भाने माहिती द्यावी. या महिलेच्या शरिरावर सापडलेल्या बांगड्या, बेन्टेक्सची ज्वेलरी या संदर्भाने पोलीसांनी घेतलेल्या माहितीत अशा पेहराव करणाऱ्या महिला नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा भागाशी जोडून असलेल्या भागातील असतात. तेलंगणा पोलीस, तेलंगणातून नांदेडकडे येणाऱ्या बस गाड्या या संदर्भाने सुध्दा तपास सुरू आहे. अनेक शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तरी पण जनतेने या अनोळखी मयत महिलेबद्दल काही माहिती असल्यास पोलीस ठाणे माहुर येथे कळवावी किंवा शिवप्रसाद मुळे यांचा मोबाईल क्रमांक 9923178909 यावर सुध्दा ही माहिती देता येईल.
संबंधीत बातमी….
20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन