लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रांतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याबाबतच्या तक्रारी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांनी आपल्या विशेष अधिकारी व अंमलदारांच्या पोलीस पथकाला तातडीने लातूर जिल्ह्यात कारवाईसाठी रवाना केले होते. या पथकाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर शहरातील विविध भागांसह ग्रामीण परिसरात एकाच वेळी धाडी टाकून मटका आणि जुगार अड्ड्यांचा भंडाफोड केला. तीन ठिकाणी धडक कारवायांचा तपशील: राजीव गांधी चौक ते कन्हेरी चौक रस्ता (शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्द): राज ऑटोमोबाईलच्या बाजूला असलेल्या राजू हौसे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर धाड टाकण्यात आली. या ठिकाणाहून १२,९५० रुपयांची रोकड आणि २४,००० रुपये किमतीचे ३ मोबाईल असा एकूण ३६,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण ४ इसमांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६३/२०२६, कलम १२ (अ), ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जुना रेणापूर नाका परिसर (शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्द): वेस्ट साईड मॉलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधील मटका बुकीवर कारवाई करून ४,३८० रुपयांची रोकड आणि २०,५०० रुपयांचे ३ मोबाईल असा एकूण २४,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात ६ इसमांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६४/२०२६, कलम १२ (अ), ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. बाभळगाव येथील शेतातील आखाडा (लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्द): किरण बालाजी मस्के यांच्या शेतातील आखाड्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर मोठा छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून ९२,३५० रुपयांची रोकड, २४ मोबाईल, ८ मोटारसायकल आणि ४ चारचाकी वाहने असा तब्बल ४२,४७,३५० रुपयांचा प्रचंड मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २० इसमांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९८/२०२६, कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. एकूण ४३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त: या तिन्ही कारवायांमध्ये मिळून पोलीस पथकाने एकूण ३० आरोपींकडून १,०९,६८० रुपयांची रोकड, ३० मोबाईल, ८ मोटारसायकल आणि ४ चारचाकी वाहने असा एकूण ४३,०९,१८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अभिनंदन व ‘खबर’ हेल्पलाइनवरून माहिती देण्याचे आवाहन: सदर मोहीम पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या फत्ते केली. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षकशहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.तसेच, नागरिकांनी परिसरातील कोणत्याही अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, यासाठी ९१ ५० १०० १०० हा खबर हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून या क्रमांकावर नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, असे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 19 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इराणने पाडले अमेरिकेचे ५८ वे ड्रोन! ट्रम्प-नेतन्याहू युद्धाच्या तयारीत, तर अमेरिकन सैनिकांमध्ये भीतीचे वातावरण?