नायगाव (प्रतिनिधी) – सामाजिक वनीकरण विभाग, नायगाव अंतर्गत अनेक वर्षांपासून रोजंदारीवर काम करणार्या कामगारांना कामापासून वंचित ठेवण्यात आल्याने आणि त्यांचे वेतन थकीत असल्याने कामगारांनी सोमवारपासून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शासकीय औद्योगिक कामगार संघटना (आयटक संलग्न), नांदेड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे, सेवाज्येष्ठतेनुसार कामाचे वाटप करावे, शासनाच्या नियमानुसार किमान वेतन द्यावे तसेच प्रलंबित वेतन अदा करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवड, रोपवाटिका, वृक्षसंवर्धन यांसह विविध शासकीय कामांमध्ये या कामगारांनी अनेक वर्षे योगदान दिले आहे. मात्र, आता त्यांनाच कामापासून दूर ठेवल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने 3 नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्याने कामगारांनी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कॉ. प्रदीप अनंतराव नागापूरकर, उपाध्यक्ष कॉ. अब्दुल गफ्फार, सरचिटणीस कॉ. शिवाजी फुलवळे यांच्यासह सुशीला आरोटे, तुकाराम भद्रे, चंद्रकांत भद्रे, अशोक धनकवाड, राजाबाई बोईनवाड, उज्वला बागडे तसेच सामाजिक वनीकरण विभागातील महिला व पुरुष कामगार सहभागी झाले आहेत. कामगारांनी अनेक वर्षे शासनाची सेवा केली असताना त्यांना बेरोजगारीच्या खाईत लोटणे अन्यायकारक आहे. त्यांच्या सेवाज्येष्ठतेचा आणि कष्टाचा विचार करून प्रशासनाने तातडीने न्याय द्यावा. मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्धार संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 52 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धरतीआबांच्या जयंतीनिमित्त किनवटमध्ये आदिवासी अस्मितेचा जागर!