इतवारा आणि कंधार येथे चोरीच्या दोन घटना; १ लाख १७ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला नांदेड (प्रतिनिधी) – शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या अंगावरील व पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नांदेडच्या जुन्या मोंढा परिसरात पाणीपुरी खात असताना एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र, तर कंधार बसस्थानकावर बसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट काढण्याच्या गडबडीत दुसऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या दोन्ही घटनांमध्ये एकूण १ लाख १७ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पहिली घटना : पाणीपुरी खाताना मंगळसूत्र लंपास पहिली घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरातील जुन्या मोंढा परिसरात रबडीवाला दुकानासमोर घडली. शुभांगी गणेश सूर्यवंशी (वय ३१, रा. अश्विनायक नगर, नांदेड) या पाणीपुरीच्या गाड्यावर पाणीपुरी खात असताना त्यांच्या पर्समधील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र, ज्याची किंमत ४९ हजार ४०० रुपये आहे, अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मरीकंटलू करीत आहेत. दुसरी घटना : कंधार बसस्थानकावर पर्समधील दागिने चोरीला दुसरी घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कंधार बसस्थानकावर घडली. कविता प्रताप गिरी (वय ३५, रा. लाठखुर्द, ता. कंधार) या बस क्रमांक एमएच-२० बीएल-३५१९ मध्ये बसण्यासाठी तिकीट काढण्याच्या गडबडीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तसेच सोबत असलेल्या महिलेच्या पर्समधील १८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कविता गिरी यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार डिकळे करीत आहेत. भर गर्दीत महिलांच्या पर्स आणि दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठ, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि बसस्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याची गरज आहे. Kanthak Suryatal Post Views: 209 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यास नकार दिल्याने पतीचा संताप; ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न खडकपुरा येथील दर्गाह शाह रहेमान आणि मस्जिद प्रकरणात महाराष्ट्र वफ्फ ट्रिबुनलने 19 नोव्हेंबर पर्यंत स्थगिती दिली