डॉ. राजू सोनसळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि केशवसुत यांच्या आधुनिक कविता : एक चिकित्सक अभ्यास’ हा विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीसाठी सादर केलेला संशोधन प्रबंध वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराला वाचनासाठी दिला. त्यातील अन्वयार्थ आमच्या काही शब्दांत वाचकांसाठी मांडत आहोत.डॉ. राजू सोनसळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मानवविद्या शाखेअंतर्गत भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल या संशोधन केंद्रातून मराठी विषयात हा प्रबंध सादर केला आहे. या संशोधनाचा केंद्रबिंदू म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत, ही संशोधनपर भूमिका चिकित्सक पद्धतीने मांडणे हा आहे. आधुनिक मराठी कवितेच्या जनकत्वाविषयी प्रचलित असलेल्या साहित्यिक धारणांचा कालसापेक्ष आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून पुनर्विचार करण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे. आधुनिक मराठी काव्याच्या बहिरंग आणि अंतरंग स्वरूपात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि केशवसुत यांच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास या प्रबंधात करण्यात आला आहे. त्याचबरोबर एकोणिसाव्या शतकातील मराठी कवितेची साहित्यिक परिस्थिती, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी, परिवर्तनशील विचारप्रवाह आणि ऐतिहासिक घटनाक्रम यांचाही सखोल मागोवा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आधुनिक मराठी कवितेच्या विकासप्रक्रियेचे मूल्यमापन करताना केवळ साहित्यिक रचनांचा विचार न करता सामाजिक परिवर्तन, मानवमुक्ती, समता, स्वातंत्र्य, शिक्षण आणि विवेकवादी विचारांचा कवितेवर झालेला परिणामही या संशोधनात अधोरेखित करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि केशवसुत यांच्या काव्यकर्तृत्वाचा तुलनात्मक व कालसापेक्ष विचार करून आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासाकडे नव्या चिकित्सक दृष्टीने पाहण्याची भूमिका हा या प्रबंधाचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या इतिहासलेखनात आणि आधुनिक कवितेच्या जनकत्व विषयीच्या चर्चेत या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. डॉ. राजू सोनसळे यांनी प्रदीर्घ अभ्यास, चिंतन आणि संशोधनातून हा विषय हाताळला आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी, संशोधकांनी आणि आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात रस असणाऱ्या वाचकांनी या संशोधनाची निश्चितच दखल घ्यावी.हा प्रबंध सर्वानी वाचावा आणि भारतात साहित्य किती मोठे होते याचा अभ्यास करून त्याचा फायदा आपल्या जीवनात आणि समाजासाठीं कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करावे. – कंथक सूर्यतळ Kanthak Suryatal Post Views: 170 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्वारातीम विद्यापीठात इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन