तेरा वर्षातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले नांदेड (प्रतिनिधी) – पत्रकार विजय जोशी निर्मित ऋतुचे रंग, सणाचे तरंग हा गुढीपासून होळीपर्यंत उत्सवांची स्वरयात्रा दर्शविणारा अनोखा कार्यक्रम आज नांदेडच्या बंदाघाटवर दिवाळी पहाटच्या निमित्ताने रंगतदार ठरला. स्टार प्रवाहाच्या कोण होणार छोटे उस्ताद या कार्यक्रमात व्दितीय पुरस्कार मिळविणार्या नायगावच्या वीरा हाक्के, संगीत दिग्दर्शक अमोल मालेगावकर, पत्रकार विजय जोशी यांच्या वेगवेगळ्या रचनामुळे दिवाळी पहाटचा हा दुसर्या दिवशीचा कार्यक्रम रसिक-प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. गेल्या तेरा वर्षातील गर्दीचे सर्व विक्रम आज नांदेडकरांनी मोडले. गुरुव्दारा बोर्ड, नागरीक सांस्कृतिक समिती आणि अशोकनगर गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय दिवाळी पहाटची आज सांगता झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, संयोजन समितीतील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रख्यात गझलकार बापू दासरी यांच्या बहारदार आणि नेटक्या संचलनाने या कार्यक्रमात आणखीनच रंगत चढली. उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन करणार्या अॅड.गजानन पिंपरखेडे यांची या कार्यक्रमाची संकल्पना होती. कोण होणार छोटे उस्ताद या स्टार प्रवाहावर गाजलेल्या कार्यक्रमात सबंध देशभरातून व्दितीय क्रमांक मिळविलेल्या नऊ वर्षीय वीरा हाक्के हिने रसिक, प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. आधी गणाला रणी आणला, या विठूचा गजर हरिनामाचा, बाजेरे मुरलीया, अंबाबाई लाड लाड, आली माझ्या घरी हि दिवाळी, खेळताना रंग बाई होळीचा, हे गाव लय न्यारं, बुगडी माझी सांडली गं, फड सांभाळ तुर्याला गं आला या एकापेक्षा एक सरस गाण्याने या नायगावच्या बाल कलाकाराने धमाल उडवून दिली. संगीत दिग्दर्शक अमोल मालेगावकर यांनी माय बाप स्वामी माझे, मुरलीवर माझा, भलगरी दादा, बजाओ ढोल स्वागत मे या वैशिष्ट्यपूर्ण रचना सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. पत्रकार विजय जोशी यांनी उठ पंढरीच्या राया, जिवा शिवाची बैलजोड, वाट दिसू दे गा देवा हि गाणी सादर करुन जोशपूर्ण वातावरण तयार केले. माधुरी पाटील वाकोडकर हिने शंभो शंकरा, रुणूझुणू त्या पाखरा, आज लक्ष्मीचं रुप हि गिते सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. उन्मनी डुघरेकर (बोरीकर) हिने गायिलेल्या अशी चिक मोत्याची माळ, नवरात्रीला नवरुपे हि गाणी सादर करुन कार्यक्रमात वेगळा रंग भरला. प्रख्यात गायक विजय बंडेवार यांनी फिरत्या चाकावरती देशी हे गीत सादर केले तर अभिनव पाटील यांनी हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा हे भक्तीगित सादर केले. गणेश हाक्के यांनी महाराष्ट्र गीत सादर करुन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला संगीत साथ गजानन कुलकर्णी, कृष्णा बोंम्पीलवार, रविराज भद्रे, राज लांबटिळे, आदित्य डावरे यांनी केली. यावेळी आमदार हेमंत पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी नांदेडच्या नागरिकांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना मदत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत भरीव मदत करण्याचे आवाहन करुन दिपावलीच्या रसिक, प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंतनू डोईफोडे, अॅड.गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, लक्ष्मण संगेवार,पुरुषोत्तम जोशी, अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आनंद जवादवार, गिरीश देशमुख आदींनी परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 157 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे बहारदार संचलन आणि प्रख्यात गायिका मृदूला दाढे आणि अमोल चव्हाण यांच्या एकापेक्षा एक सरस गाण्याने बहरली नांदेडची दिवाळी पहाट