नांदेड –  जिल्ह्यातील अवैध सावकारी, शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारणी आणि जबरीने कर्जवसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारांना बळी पडलेल्या नागरिकांनी कोणत्याही दबावाला न घाबरता निर्भयपणे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सावकारी समितीच्या बैठकीत प्राप्त तक्रारींचा प्रकरणनिहाय आढावा घेण्यात आला. अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची विशेष तपासणी सुरू असून, कर्जवाटप व वसुलीची पद्धत, परवान्यातील अटींचे पालन, व्याजदरांची आकारणी तसेच वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे.

शासनाच्या १६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना दिलेल्या तारण कर्जासाठी वार्षिक ९ टक्के, तर विनातारण कर्जासाठी १२ टक्के व्याजदर निर्धारित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिलेल्या तारण कर्जासाठी १५ टक्के, तर विनातारण कर्जासाठी १८ टक्के वार्षिक व्याजदराची मर्यादा आहे. या मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारणे तसेच चक्रवाढ किंवा दंडव्याज आकारणे अनुज्ञेय नाही.

सद्यस्थितीत जिल्ह्यात १८८ वैध परवानाधारक सावकार असून, त्यापैकी ११४ सावकार नांदेड तालुक्यात आहेत. विशेष तपासणी मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६२ सावकारांच्या दप्तरांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आवाहनानंतरच्या दहा दिवसांत अवैध सावकारीसंदर्भात २३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १५ तक्रारींची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.

सावकारांकडून जबरदस्तीने किंवा दबाव टाकून कर्जवसुली केली जात असल्यास अथवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारले जात असल्यास नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड किंवा संबंधित तालुक्याच्या उपनिबंधक अथवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींची पडताळणी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अवैध सावकारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!