तक्रारींच्या जलद निवारणासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश; संवेदना प्रणालीद्वारे होणार कार्यवाहीचा पाठपुरावा लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जनसंवाद उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील २५ तक्रारदारांनी विविध समस्यांबाबत आपले लेखी अर्ज त्यांच्याकडे सादर केले. नांदेड परिक्षेत्रातील पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, या हेतूने उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये जनसंवाद हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेणे आणि त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लातूर जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी उपमहानिरीक्षक उमाप हे सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. याच दौऱ्यात दुपारी ३ ते ५ या वेळेत त्यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यामध्ये मालमत्तेचे वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, सायबर फसवणूक, पोलीस संरक्षणाची मागणी, कौटुंबिक वाद तसेच जीवे मारण्याच्या धमक्यांसारख्या विविध विषयांचा समावेश होता. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत उपमहानिरीक्षकांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि योग्य पद्धतीने निराकरण करण्यावर त्यांनी भर दिला. तक्रारदारांच्या अर्जांवर झालेल्या कार्यवाहीत पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी नांदेड परिक्षेत्र कार्यालयामार्फत यापूर्वीच संवेदना ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जनसंवाद उपक्रमात प्राप्त झालेले सर्व २५ अर्ज या प्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक तक्रारीवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, याची माहिती परिक्षेत्र कार्यालयातील विशेष फीडबॅक टीमकडून घेतली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या या उपक्रमामुळे पोलीस प्रशासन आणि जनतेमधील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 16 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्ञानेश कुमारांविरुद्धचा लढा संपलेला नाही! अभिनेते प्रकाश राज यांच्या साथीने अभिजीत दीपके नोव्हेंबरला केरळमध्ये ठिय्या मांडणार!