१ लाख ४० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल लंपास; विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) –  शहरात मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, हर्षनगर रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी एका व्यक्तीच्या हातातील तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हर्षनगर रोड, नांदेड येथे अरुण अंबाजी धुमाळ (वय ४६, रा. हर्षनगर, नांदेड) हे रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत उभे होते. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांच्या हातातील महागडा मोबाईल फोन अचानक हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला. हिसकावून नेलेल्या मोबाईलची किंमत तब्बल १ लाख ४० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादी अरुण अंबाजी धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४(२) व ३(५) प्रमाणे तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोमलवार करीत आहेत. सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी रस्त्यावर मोबाईल वापरताना सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!