नांदेड.(प्रतिनिधी) अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे तर्फे २०२३मधील प्रकाशित पुस्तकांसाठीचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून नांदेड येथील कवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या ‘इटुकली पिटुकली’ या बालकवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
हे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. न. म. जोशी हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून किरण केंद्रे (कार्यकारी संपादक किशोर मासिक) हे राहणार असून मधुमिलिंद मेहेंदळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
हा समारंभ दिनांक १९ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती शुक्रवार पेठ, पुणे येथे होणार आहे असे या साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे व कार्याध्यक्ष डॉ. दिलीप गरूड यांनी कळविले आहे.
यापूर्वीही कवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या ‘इटुकली पिटुकली’ या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने उत्कृष्ट पुस्तक निर्मितीचा प्रथम पुरस्कार त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ निर्मितीचा प्रथम पुरस्कार असे दोन पुरस्कार देऊन गौरविले आहे. या यशाबद्दल मीनाक्षी आचमे-चित्तरवाड याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.