स्ट्रीट सेफ्टी पथक व भाग्यनगर पोलिसांची संयुक्त कारवाई; ४ किलो ७१० ग्रॅम ओला गांजा हस्तगत नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील अवैध अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत जय भवानी चौक परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘स्ट्रीट सेफ्टी पथक’ आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करत ४ किलो ७१० ग्रॅम ओला गांजा जप्त केला. या गांजाची किंमत २ लाख ३५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २५ ऑक्टोबर रोजी पहाटे जय भवानी चौक परिसरात गांजाची चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने दोन संशयित व्यक्ती गांजाच्या झाडांच्या फांद्यांची मोळी घेऊन जात असल्याची माहिती स्ट्रीट सेफ्टी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नृसिंह पोमनाळकर यांनी भाग्यनगर पोलिसांना दिली. या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांची परवानगी घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वजणे आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पंच, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा चालक, छायाचित्रकार आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत संशयितांची झडती घेण्यात आली. या कारवाईत तुकाराम सुमाराव पावडे (वय ५०, व्यवसाय शेती, रा. वाडी बु., ता. जि. नांदेड) आणि कृष्ण नरसिंग वायवळे (वय ५१, व्यवसाय मजुरी, रा. इंदिरानगर, नवी वाडी, नांदेड) यांच्याकडून पांढऱ्या दोरीने बांधलेली गांजाच्या झाडांच्या फांद्यांची मोळी आढळली. फॉरेन्सिक पथकाने तपासणी केल्यानंतर हा अंमली पदार्थ गांजा असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर ४ किलो ७१० ग्रॅम वजनाचा गांजा सीलबंद करून पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला. प्लॉटमधील गांजाच्या झाडांच्या फांद्या तोडून विक्रीचा प्रयत्न? पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत तुकाराम पावडे याने कृष्ण वायवळे याच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी आपल्या प्लॉटमधील गांजाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्या चोरीछुप्या पद्धतीने विक्रीसाठी नेत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार चवरे, बसमतकर, कांबळे, बालाजी चव्हाण, मुंढे, गवाले व अन्य कर्मचारी, तसेच ‘स्ट्रीट सेफ्टी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नृसिंह पोमनाळकर आणि अंमलदार अमलापुरे व हानमते यांनी सहभाग घेतला. शहरातील अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गांजाच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 136 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाहीचा भन्नाट खाक्या! नेत्याला फोन करणारा शेतकरी ठरला गुन्हेगार; पोलिसांकडून बेदम चोप अन् कोऱ्या बॉन्डवर सह्यांचे शाही सत्र! लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची धाड; १३ जणांवर कारवाई