महावीर चौकात दूध उत्पादक पशुपालकांशी साधला थेट संवाद

चारा साक्षरता अभियानातून शास्त्रीय व्यवस्थापनाचे आवाहन

दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट समन्वय

नांदेड –  दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा व सकस चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी उपलब्ध पीक अवशेषांचा योग्य वापर करावा. चारा उत्पादन, साठवणूक आणि पशुखाद्य व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड शहरातील मतदान केंद्रांना भेटी देत असताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावीर चौक येथे दूध विक्रीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक पशुपालकांची आकस्मिक भेट घेतली. यावेळी त्यांनी पशुपालकांशी थेट संवाद साधून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता आणि चारा साक्षरता अभियानाबाबत चर्चा केली.

पीक अवशेषांवर प्रक्रिया करून सकस चारा तयार करा

या संवादादरम्यान निकृष्ट चारा सकस बनविण्याच्या विविध पद्धती, युरिया-मोलॅसिस प्रक्रिया, मुरघास निर्मिती, अझोला उत्पादन आणि जलद हिरवा चारा उत्पादनाच्या जलसंवर्धित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध सोयाबीन कुटार, हरभरा कुटार, गव्हाचे काड आणि इतर पीक अवशेषांवर योग्य प्रक्रिया करून त्यांची पौष्टिकता वाढविता येते. तसेच हिरवा मका व नेपिअर गवतापासून मुरघास तयार करून त्याचा दुष्काळी काळात उपयोग करता येतो. कमी खर्चात अझोला आणि जलसंवर्धित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिरवा चारा उपलब्ध करण्यावरही भर देण्यात आला. सोयाबीनचे कुटार न जाळता त्याचा पशुखाद्य म्हणून वापर करावा किंवा त्याची विक्री करून आर्थिक लाभ मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. चारा साक्षरता अभियानाच्या माध्यमातून चारा उत्पादन, साठवणूक आणि शास्त्रीय पशुखाद्य व्यवस्थापनाबाबत पशुपालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट समन्वय

दूध उत्पादकांच्या विविध समस्या व अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी दूध उत्पादकांच्या व्हॉट्सॲप समूहात जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच पशुसंवर्धन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामुळे दूध उत्पादक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधून समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

रब्बी हंगामात ज्वारीच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी ज्वारीच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी व पशुपालकांनी चारा उत्पादन वाढवावे आणि आगामी काळातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.यावेळी संतोष वाघमारे व शिवानंद सूर्यवंशी (कोटीतीर्थ), बालाजी श्रीसागर (बोरगाव), दत्ता शिंदे (डोनवाडा), दिनकर भोसले (वाघी) आणि नामदेव येवले (मार्कंड) या दूध उत्पादक पशुपालकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संवर्धन, चारा व्यवस्थापन आणि दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून थेट संवाद व समन्वयाला प्राधान्य देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!