उंबऱ्याच्या आत घरातच हरवलेली,
ती आज उंबरा ओलांडू पाहत आहे,
कर्तव्याच्या चौकटीत बंदीस्त ती,
स्वतात स्वतःला शोधू पाहत आहे.

पहाटेच्या मंद प्रकाशात चहाचे पाणी उकळायला लागते. घरातील सर्वांच्या चहाची व्यवस्था करतांना ती चहा गाळते. अचानक एक क्षण येतो, जिथे ती स्त्री स्वतःकडे पाहते. आरशात स्वतःचा चेहरा पाहताना तिला प्रश्न पडतो, “गेली कित्येक वर्षे मी या घरासाठी, सगळ्यांसाठी राबले. पण या सगळ्यांत माझी स्वतःची जागा कुठे होती? मी माझ्यासाठी कधी जगले का?” हा प्रश्न कुठल्या एका घराचा नाही. उंबऱ्यापासून सुरू होऊन चार भिंतींत स्वतःला विसरून गेलेल्या प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न अंतर्मनातून सुन्न करतो.

स्त्रीचा प्रवास परंपरेने उंबऱ्यापासून सुरू होतो. लग्नानंतर ती नवीन घरात प्रवेश करते. त्या वेळी ओलांडलेले अक्षतांचे माप आणि खाली वळलेले डोळे तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात मानली गेली. पण ती उंबरा ओलांडून घरात आल्यावर तिचा खरा प्रवास सुरू होतो. ती कधी घराची केरसुणी बनते. कधी अंगणात सडा रांगोळी घालणारे कोमल हात बनते. चूल पेटवण्यासाठी ती स्वतः जळणारी लाकडे बनते. ती स्वतःला बारीक पिठात दळून घेणारे जाते बनते. ती आयुष्यभर नाचणारी रवी बनते. घराच्या भिंती आणि छप्पर होऊन तिने कुटुंबाला आधार दिला. संकटांचे झोत स्वतःच्या अंगावर घेतले. पणती, वात आणि तेल होऊन तिने घराचे कोपरे उजळून टाकले. पण या प्रकाशात तिची स्वतःची सावली मात्र कुठेतरी अंधारात हरवून गेली.

सून, पत्नी, आई आणि सासू या सामाजिक भूमिका पार पाडताना तिने स्वतःला झोकून दिले. एक दिवस तिला जाणवले, या सगळ्यांत मी माझी ‘मी’च हरवून बसले आहे. कुटुंबासाठी सर्वस्व देताना स्वतःचे अस्तित्व, आवडीनिवडी, स्वप्ने आणि स्वतःचा श्वास कुठे मागे सुटला, याची जाणीव तिला आता होऊ लागली आहे.

पण आजची स्त्री बदलते आहे. ती आता तिच्या या प्रवासाकडे अधिक समजून पाहते आहे. तिला तिची नाती नाकारायची नाहीत. ज्या माणसांवर ती प्रेम करते, त्यांना दूर करायचे नाही. पण त्याच वेळी, त्या नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे हरवायचे नाही. तिला घर सांभाळायचे आहे. संसाराचा गाडा ताकदीने ओढायचा आहे. पण त्याचसोबत स्वतःच्या सुप्त इच्छांना, क्षमतांना आणि स्वप्नांना मोकळी वाट द्यायची आहे.

आजचा बदल फक्त एका व्यक्तीचा नाही. हा बदल एका मानसिकतेचे क्षितीज बदलणारा प्रवास आहे. आजची स्त्री शिकते आहे. ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, कला, राजकारण, उद्योग आणि समाजकारण या प्रत्येक क्षेत्रात ती आपला प्रभाव दाखवते आहे. ती कुटुंबाची जबाबदारी उचलताना स्वतःच्या अस्तित्वाची पायाभरणी करते आहे. तिने घेतलेला हा निर्णय पुरुषांविरुद्ध संघर्ष नाही. हा शोध आहे स्वतःच्या आत्मसन्मानाचा, परस्पर आदराचा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा.

तिच्या या बदलाचा अर्थ असा नाही की ती कुटुंबापासून किंवा संसारापासून दूर जात आहे. तिला हे समजले आहे की त्याग ही तिची कायमची ओळख राहू शकत नाही. ती जबाबदाऱ्या स्वीकारते. पण त्या फक्त तिच्याच वाट्याला याव्यात, हे तिला आता मान्य नाही. तिला घराबाहेर पडण्यासाठी घर सोडण्याची गरज नाही. तिला स्वतःच्या घरात राहूनच स्वतःसाठी एक स्वतंत्र जागा हवी आहे. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा आहे.

आज ती जेव्हा आरशात स्वतःकडे पाहते, तेव्हा तिला तिचे हरवलेले तुकडे पुन्हा एकत्र करायचे आहेत. भूतकाळातील कष्ट आणि समर्पण घेऊन तिला नव्या आकाशाकडे झेप घ्यायची आहे. तिने आयुष्यभर घर उजळवले आहे. आता त्या प्रकाशात तिला स्वतःचा चेहरा नव्या आत्मविश्वासाने पाहायचा आहे.

स्त्रीने घराच्या उंबऱ्याबाहेर पडूनच जग जिंकावे असे नाही. तिने स्वतःच्या घरात, स्वतःच्या मनात आणि समाजात सन्मानाने स्वतःचे स्थान निर्माण केले, तरी तो एका मोठ्या परिवर्तनाचा विजय असतो. कारण, स्वतःला न हरवता आपल्या माणसांसोबत स्वतःचेही स्वतंत्र विश्व जगणे म्हणजे खरे जगणे होय. आणि आजची स्त्री याच वाटेवर एका नव्या दमाने, मोकळा श्वास घेण्यासाठी पावले टाकत आहे.

राहूल हरीभाऊ इंगळे पाटील – मोबाईल ९८९०५७७१२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!