नांदेड (प्रतिनिधी) -सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते विशाल कोकरे यांना धम्मरत्न समाजगौरव पुरस्कार-२०२६ जाहीर झाला आहे. माँ जिजाऊ महिला सक्षमीकरण विकास केंद्र, नांदेड आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट आर्टिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथील कुसुम सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडवून आणलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मरणार्थ नांदेडमध्ये ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त बजरंग बुद्ध-भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सामाजिक परिवर्तन, समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजही प्रेरणादायी आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशाल कोकरे यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजातील इतर व्यक्तींनाही सामाजिक सेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या पुरस्कार सोहळ्यास विशाल कोकरे यांनी सपत्नीक तसेच संपूर्ण सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वाचे स्मरण करावे, असेही आयोजकांनी म्हटले आहे. माँ जिजाऊ महिला सक्षमीकरण विकास केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहआयोजक हिंगोले चंद्रशेखर यांनी पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली. Kanthak Suryatal Post Views: 113 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाद्रपद पौर्णिमेनिमित्त एकशे बारावी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी; बुद्ध, धम्म आणि संघाचा निनादला सूर