पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचा पदभार स्वीकारताच ॲक्शन मोड; आयजी पथकासह संयुक्त कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ नांदेड (प्रतिनिधी) – मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुदखेड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने कारवाई करत अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी पावले उचलली. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (आयजी) पथकाने मुदखेड पोलिसांच्या मदतीने ९ ऑक्टोबर रोजी रात्री केलेल्या संयुक्त मोहिमेत तब्बल ४ कोटी १३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील माहटी, खुजडा आणि टाकळी परिसरात गोदावरी नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची चर्चा होती. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळू काढून तिची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकारामुळे नदीपात्राच्या पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची तसेच शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पदभार स्वीकारताच कारवाईचा धडाका मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण यांची बदली झाल्यानंतर (ही कार्यवाही करीत नसतील म्हणून बदली करण्यात आली काय? ) तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनात काही काळ शिथिलता येईल, असा अंदाज बांधून नदीपात्रात पुन्हा वाळू उपसा सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या हालचालींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाच्या सहकार्याने (या पथकात पोलीस उप निरीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,गणेश राठोड,संदीप वाघाडे,गजानन डवरे यांचा समावेश आहे) ९ ऑक्टोबरच्या रात्री माहटी परिसरातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईत वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी वाहने आणि यंत्रसामग्री पोलिसांनी ताब्यात घेतली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाला या कारवाईमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सहा जेसीबीसह १२ वाहने जप्त या संयुक्त कारवाईत पोलिसांनी एकूण १२ वाहने व यंत्रे जप्त केली. त्यामध्ये पाच हायवा, एक टिप्पर आणि सहा जेसीबींचा समावेश आहे. जप्त केलेल्या सर्व वाहनांची व यंत्रसामग्रीची एकत्रित किंमत ४ कोटी १३ लाख ७५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. अवैध वाळू उपशासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे केवळ वाळू वाहतूक करणाऱ्यांवरच नव्हे, तर या व्यवसायामागील संपूर्ण यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातील पुढील तपासादरम्यान अवैध उपशात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच केलेल्या या कारवाईमुळे मुदखेड तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारवाईचे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्याची मागणीही महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, एका रात्रीच्या कारवाईपुरते मर्यादित न राहता नदीपात्रातील संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त, अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखला गेल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो. आता पोलिसांकडून पुढील तपासात कोणती माहिती समोर येते आणि अवैध वाळू उपशाविरोधातील मोहीम कितपत सातत्याने सुरू राहते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. असे आहेत या वाळू प्रकरणातील आरोपीत मौजे मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड परिसरात अवैध वाळू उत्खनन, वाळूची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करून शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या कथित अवैध वाळू व्यवसायासंदर्भात मुदखेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१९२/२०२६ मधील आरोपींच्या यादीत अनुक्रमांक १) शिवराज संभाजी ढगे, २) तुळशीराम शामराव हुनमंते, ३) सदाशिव गोणेवाड ४) बळी दतराम ढगे, ५) गुलाब जाधव, ६)परमेश्वर जाधव, ७) अवधूत गोविंदराव ढगे, ८) उद्धव राजू जाधव, ९) ज्ञानेश्वर आनंदाराव जाधव व १०) गजानन राजू जाधव यांची नावे नमूद आहेत. Kanthak Suryatal Post Views: 130 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राजधानीत अघोषित आणीबाणीचा तांडव आणि लोकशाहीचा खून नवव्यांदा अटक झाली तरी माघार नाही! – एम्सजवळ नेहा बोरांचा सरकारला थेट इशारा!