चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार नांदेड (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य चारा टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, या अभियानाची सुरुवात आज बिलोली तालुक्यातील मौजे रामतीर्थ येथे करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रगतिशील शेतकरी व पशुपालक गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून पशुधनास आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या अभियानातून शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोयाबीन व हरभरा कुटारावर युरिया-काकवी प्रक्रिया रामतीर्थ येथील प्रात्यक्षिकात उपलब्ध सोयाबीन कुटार व हरभरा कुटारावर युरिया व मोलासेस (काकवी) प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत प्रत्यक्ष दाखविण्यात आली. या प्रक्रियेमुळे उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता व रुचकरता वाढविण्याच्या पद्धतीची माहिती पशुपालकांना देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत नवीन चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन करणे, त्याची साठवणूक करणे आणि उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. याबाबतही या वेळी शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. चारा टंचाईच्या काळात शास्त्रीय व्यवस्थापनावर भर चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता वाढवून त्याचा प्रभावी वापर केल्यास पशुधनासाठी आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्ध करून देता येतो. त्यामुळे पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन व संवर्धन करण्याबरोबरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करावा, हा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘चारा साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांना उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर, चारा संवर्धन, प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे पोषण अबाधित ठेवण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती व प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.सखाराम खुणे, सहायक आयुक्त डॉ.प्रविणकुमार घुले यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 57 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये ४ ऑक्टोबरला रंगणार वंदे मातरम् महोत्सव २०२६