प्रवासी, स्वयंसेवी संस्था आणि रेल्वे वापरकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग ;स्वच्छता आणि प्रवासी सुविधांबाबत प्रवाशांनी मांडल्या सूचना

छत्रपती संभाजीनगर  (प्रतिनिधी) –  स्वच्छता ही सेवा 2026 अभियानाचा एक भाग म्हणून रेल्वे स्थानके व गाड्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आज, 03 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्री सीएच. कल्याण राजू, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री दिलीप कुमार दास, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग, श्री प्रकाश प्रजापत, उपमुख्य अभियंता (बांधकाम) आणि श्री अखिल पल्लीवार, विभागीय पर्यावरण अभियंता यांच्यासह रेल्वे अधिकारी, प्रवासी, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रेल्वे वापरकर्ता गट तसेच इतर संबंधित घटक सहभागी झाले.

उपस्थितांना संबोधित करताना श्री सीएच. कल्याण राजू, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी ‘स्वच्छता ही सेवा 2026’ अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनासोबतच प्रवाशांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांनी निर्धारित कचरापेट्यांचा वापर करावा, प्लॅटफॉर्म तसेच गाड्यांमध्ये कचरा टाकू नये आणि स्वच्छ रेल्वे परिसर राखण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक तसेच गाड्यांमधील स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नांदेड विभागाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये नियमित स्वच्छता मोहिमा, स्वच्छता व्यवस्थेचे निरीक्षण, प्रवासी सुविधांची देखभाल व सुधारणा, प्रभावी कचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छतेचे निकष अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा समावेश आहे.

स्वच्छतेशी संबंधित Rail Madad तक्रारींमध्ये 45% घट

योग्य नियोजन, पद्धतशीर देखरेख आणि विभागाकडून करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, स्वच्छतेशी संबंधित Rail Madad तक्रारींमध्ये चालू वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 45% घट झाली आहे. ही लक्षणीय घट रेल्वे स्थानके आणि गाड्यांमधील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच प्रवाशांच्या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे.

सफाई मित्र आणि स्वच्छता पर्यवेक्षकांचा सत्कार

यावेळी रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये स्वच्छता राखण्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सफाई मित्र आणि स्वच्छता पर्यवेक्षकांचा सन्मान करण्यात आला. सीएच. कल्याण राजू, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर कार्यरत सफाई मित्र तसेच हडपसर एक्सप्रेसचे OBHS पर्यवेक्षक यांचा त्यांच्या समर्पित सेवेसाठी सत्कार केला.

स्वच्छ रेल्वे परिसर आणि प्रवाशांना अधिक चांगला प्रवासाचा अनुभव मिळवून देण्यासाठी सफाई मित्र आणि पर्यवेक्षकांकडून करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योगदानाची यावेळी दखल घेण्यात आली. रेल्वे परिसर तसेच गाड्यांमध्ये स्वच्छता राखण्यात त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका आहे.मी स्वच्छता आणि प्रवासी सुविधांबाबत प्रवाशांनी मांडल्या सूचना जनसंवाद कार्यक्रमादरम्यान प्रवाशांनी स्वच्छता, प्रसाधनगृहे, प्लॅटफॉर्मवरील सुविधा तसेच गाड्यांमधील स्वच्छतेबाबत आपले अनुभव आणि सूचना मांडल्या.

सहभागी प्रवाशांनी विशेषतः पुढील सूचना केल्या:

* कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पुरेशा प्रमाणात कचरापेट्या उपलब्ध करून त्यांचे नियमित रिक्तीकरण करावे.
* प्रवाशांसाठी उपलब्ध प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता आणि योग्य देखभाल सुनिश्चित करावी.
* खाद्यपदार्थांचे वेष्टन, प्लास्टिक तसेच इतर कचरा गाड्यांमध्ये टाकू नये यासाठी प्रवासी जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवावी.
* गाड्यांमधील डब्यांची नियमित स्वच्छता आणि कचरा संकलनाची व्यवस्था अधिक सक्षम करावी.
* प्रवाशांच्या तक्रारी व अभिप्राय त्वरित नोंदविण्यासाठी Rail Madad प्रणालीबाबत अधिक जनजागृती करावी.

सहभागी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध स्वच्छता उपक्रमांचे स्वागत केले तसेच स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले. स्वच्छता उपक्रमांमध्ये रेल्वे कर्मचारी, प्रवासी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि प्रवासी यांचा सहभाग आणखी वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सहभागी प्रवाशांच्या सूचना आणि अभिप्राय काळजीपूर्वक ऐकून घेतले असून, मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा योग्य त्या पद्धतीने विचार करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. जनसंवाद कार्यक्रमातून ‘स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे’ हा संदेश अधोरेखित झाला. स्वच्छ आणि सुस्थितीत असलेली रेल्वे स्थानके व गाड्या राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच प्रवासी, रेल्वे वापरकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचे सक्रिय सहकार्य आवश्यक आहे. स्वच्छता ही समाजाची सामायिक जबाबदारी आहे. ती सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास, प्रदूषण कमी करण्यास आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शाश्वत स्वच्छतेच्या सवयी निर्माण करण्यास मदत करते.

नांदेड विभागातर्फे सर्व प्रवासी आणि रेल्वे वापरकर्त्यांना ‘स्वच्छता ही सेवा 2026’ अभियानाचे सक्रिय भागीदार होऊन रेल्वे स्थानके आणि गाड्या अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वांसाठी आनंददायी बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!