नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कार्यालयात साध्या एका ना हरकत प्रमाणपत्रासाठी नागरिकांना किती फेऱ्या माराव्या लागतात आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दुकान कसे चालते, याचा एक उघड नमुना नांदेडमध्ये समोर आला आहे. मला चाराण्याचेही विचारले नाही, साधा चहाही पाजला नाही, मग मी पुढे सर्व्हिस कशी व्यवस्थित करू? असा सवाल करत कंत्राटदाराकडून अडीच लाखांची लाच उकळू पाहणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कनिष्ठ लिपीकाला आणि त्याच्या खाजगी मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात पकडले आहे. चार आणे खर्च केले नाहीत अन् चहाही पाजला नाही! – लाचेची खोचक कहाणी नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालयात एका ३२ वर्षीय कंत्राटदाराने आपल्या पेट्रोल पंपाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र, नेहमीच्या सरकारी शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या अर्जात वेळोवेळी जाणीवपूर्वक त्रुटी काढल्या जात होत्या. दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार कार्यालयात गेले असता, त्यांची भेट हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे काम पाहणारे खाजगी अभियंता सतीश मधुकर वाघोळे यांच्याशी झाली. वाघोळे यांनी तात्काळ मध्यस्थाची भूमिका घेत, त्रुटी न काढता एनओसी लवकर हवी असेल, तर कनिष्ठ लिपीक सुकेश भीमराव नहारे यांना २,५०,००० रुपये द्यावे लागतील असा दरच सांगितला. फोनवरून लाचेचे डिलिंग अन् सहमतीची मोहर! लाचेच्या मागणीची सत्यता पडताळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक ३० सप्टेंबर २०२६ आणि ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी तरोडा नाका येथील सालासार बिल्डिंग समोरील एचपीसीएल विभागीय कार्यालयासमोर पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान खाजगी मध्यस्थ सतीश वाघोळे याने कनिष्ठ लिपीक सुकेश नहारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी नहारे साहेबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तुम्ही माझ्यासाठी चार आणेही खर्च केले नाहीत, साधा चहाही पाजला नाही! आम्ही तुम्हाला डिव्हिजन कव्हर करून देणार, पण मला याच्यात काहीच उरत नाही, असा सूर आळवत, गावातलेच माणूस आहेत, बोलून घ्या त्यांच्याशी असे सांगत लाचेच्या मागणीला बिनदिक्कत संमती दर्शवली. सार्वजनिक बांधकाम मंडळ आवारात धाड; १.२० लाखांचा हप्ता स्वीकारताना रंगेहात! अडीच लाखांच्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून १,२०,००० रुपये देण्याचे ठरले. दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी १७:५७ वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय नांदेडच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १,२०,००० रुपयांची लाच रक्कम स्वतः स्वीकारताना खाजगी इसम सतीश वाघोळे याला जाळ्यात पकडण्यात आले. या प्रकरणात लोकसेवक सुकेश नहारे आणि मध्यस्थ सतीश वाघोळे या दोघांनाही १ ऑक्टोबर २०२६ रोजी तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, ७ अ, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणारे एसीबीचे शिलेदार ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाराजी थोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मारोती मुलगीर, गजानन पवार, अमोल जाधव, विनोद पुंडगे व शेख अकबर या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. Kanthak Suryatal Post Views: 127 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्ञानेश कुमारांना भारत रत्न की लोकशाहीच्या हत्येचे बक्षीस? निवडणूक आयोगाच्या महानाटकाचा पर्दाफाश! शहाजी उमपांच्या प्रयत्नांना आलेले महिन्याभरातील यश;1607 गुन्हे दाखल, 21 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत