बिलोली –  वाहन अडवून चालकावर लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिलोली शहरातील आरटीओ ऑफिससमोर २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रतनलालजी बामणिया (वय २९, व्यवसाय चालक) हे आपल्या ताब्यातील आरजे-०९ जीडी-७८७४ क्रमांकाच्या वाहनातून मंदसौर ते हैदराबाद असा प्रवास करत होते. यावेळी आरोपींनी संगनमत करून वाहन अडविले. त्यानंतर फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात विजय बामणिया हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात अविनाश डोपोड (बिलोली), लक्ष्मण मोतीराम इबितवार (कासराळी), श्रावण इबितवार (कासराळी), देवीदास शेखरो,ड (कासराळी), राजेश सुरेश देशमुख (बामणी), योगेश उमाकांत कादरकुंटे (काळी, बिलोली) आणि संदीप गादगे (बिलोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विजय बामणिया यांच्या तक्रारीवरून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२५/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१), १२७(२), १८९(२), १९०, २९६, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जाधव करीत आहेत. घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!