नांदेड,(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्याच्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड जिल्ह्यात नामवंत असलेल्या संतोष माधव धूतराज या प्रभात नगर हल्ली मुक्काम तळणी शिवार येथे राहणाऱ्या व्यक्तीने सन 2017 मध्ये औसा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला होता. त्या संदर्भाने तेथे एक गुन्हा प्रलंबित होता. संतोष धूतराजने नांदेड जिल्ह्यात सुद्धा अनेक गुन्हे केले आहेत. पाटनुर घाटात त्याने पकडायला गेलेल्या नांदेड पोलीस पथकावर सुद्धा हल्ला केला होता.
औसा येथील गुन्ह्यांच्या तपासा दरम्यान लातूर जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक केंद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर बावकर आणि त्यांचे सहकारी संतोषला पकडण्यासाठी ऑगस्ट 2017 मध्ये नागपंचमीच्या दिवशी आले होते. तळणी शिवारात पोलीस पथकाला पाहताच संतोष धुतराजने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यात काही पोलीस जखमी झाले होते.या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307,353,186,504,506 नुसार पुन्हा क्रमांक 67/ 2017 दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी करून संतोष धुतराजविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयात समोर आलेल्या पुराव्यानंतर न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी संतोष माधव धूतराज (41) यास कलम 307 नुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंड तसेच कलम 353 नुसार 6 महिने शिक्षा व 5 हजार रुपये रोखदंड तसेच कलम 504 प्रमाणे 4 महिने शिक्षा ठोठावली आहे. दंडाची एकूण रक्कम 30 हजार रुपये होत आहे. यापूर्वी सुद्धा संतोषला काही प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली आहे. या खटल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन.दळवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार एस. एम. सुब्बनवाड यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पूर्ण केले.