बिलोली (प्रतिनिधी)- अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना बिलोली येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपींना अतिरिक्त ६ महिने सश्रम कारावास भोगावा लागेल. बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश – १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. शिक्षा झालेल्या आरोपींची नावे व पत्ता: १) गोकुळ नारायण राजपूत (वय ३२ वर्षे, रा. होणोबाचीवाडी, ता. पैठण, जि. संभाजीनगर). २) सुनील यादव महाजन (वय ३५ वर्षे, रा. जिजामाता शाळा, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव). विशाखापट्टणम ते जळगाव गांजाची तस्करी: सदर घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की, स्वापक नियंत्रण ब्यूरो (NCB) मुंबईचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी समीर वानखेडे यांना १४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५:४५ वाजता नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडगा ते कहाळा रोडवरील महाबोधी बौद्ध विहाराजवळ मांजराम रोडवर सापळा रचण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी संशयास्पद ट्रक क्रमांक MH 26 AD 2165 अडवून त्याची झडती घेतली. या ट्रकमध्ये विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विशाखापट्टणम येथून जळगावच्या दिशेने नेला जाणारा १ क्विंटल २७ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एनसीबी मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमोल मोरे यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९८/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रिया व निकाल: या गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासिक अंमलदार विठ्ठल पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले सबळ पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपींना अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक पदार्थ कायदा (NDPS Act) १९८५ च्या कलम ८ (क), २०(ब)(२)(क), २८ आणि २९ नुसार दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. न्यायालयीन कामकाजात सहकार्य: या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत ऍड. जयेश संदीप अग्रवाल, ऍड. योगेश सतीश पुंड, पैरवी कर्मचारी एच. एन. सुगांवे, ए. एस. आय. नायगाव, शेख इम्रान, शेख मन्सूर (कनिष्ठ लिपिक) आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नांदेडचे पोलीस हवालदार ७३७ महेंद्र दासरवार यांनी सहकार्य केले. Post Views: 147 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation सर्टिफिकेट माझे, रक्त-लघवी तुमची… मलिदा मात्र भलत्याचाच! सत्तेच्या छातीत धडकी! जेव्हा फेअरलेस जेन झी रस्त्यावर उतरते, तेव्हा हुकूमशाहीचे सिंहासन हलते!