डीआयजी पथकाची नांदेडमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा दणका

१ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; ६ जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वाहेगाव शिवारात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथक पाठविले होते. त्यानुसार ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मौजे वाहेगाव शिवारात पथकाने धडक कारवाई केली.

कारवाईदरम्यान नदीपात्रातून इंजिन बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे तसेच फाफर (फायबर) बोटीच्या माध्यमातून नदीकिनारी वाळू आणली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एक इंजिन बोट, एक फायबर बोट, वाळूने भरलेले १७ ताराफे, दोन हाफवे, एक जेसीबी मशीन तसेच नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली सुमारे १०० ब्रास वाळू जप्त केली. या सर्व जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३५ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणात प्रज्वल सदाशिव दुधमल, गजानन हबडे, आनंद संतोषराव मोरे, सुरज मोरे, अमोल गोविंदराव देसाई आणि तुकाराम मोरे या सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), ३(५) सह कलम ४८(७), ४८(८), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ९.१५, पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, पोलीस हवालदार गणेश राठोड, पोलीस हवालदार संदीप वाघाडे आणि पोलीस हवालदार गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.

अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना द्या

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यालयाकडून खबर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!