नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याच्या मागील मोकळ्या जागेत एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना शिवाजीनगर गुन्हेशोध पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात यश आले. या कारवाईत रोख रक्कम, दोन मोबाईल, हातोडा, स्क्रूड्रायव्हर आणि मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने २२ ऑगस्ट रोजी दुपारी शिवाजीनगर गुन्हेशोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वसंतराव नाईक पुतळ्याजवळील एटीएम फोडून रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत पाच जण टाटा नेक्सॉन वाहनात बसले आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पाच संशयित एकमेकांशी बोलताना दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले; मात्र अन्य तिघे मेहंदी रंगाच्या टाटा नेक्सॉनमधून फरार झाले.
पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे संजय साहू शिवअवतार साहू (वय १९) आणि आदित्य राजसिंह सज्जनसिंह (वय २१), दोघेही रा. सिकाटिया, जि. कानपूर, उत्तर प्रदेश अशी आहेत. त्यांच्या अंगझडतीत १ हजार ५० रुपये रोख, दोन मोबाईल, हातोडा, स्क्रूड्रायव्हर व मिरची पावडर जप्त करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी नाईक पुतळ्याजवळील एटीएमची पाहणी करून रात्री एटीएम फोडून त्यातील रोख रक्कम चोरण्याचा बेत असल्याची माहिती दिली. फरार साथीदारांची नावे शिवबरणसिंग उर्फ सिब्बू ठाकूर, विश्वजितसिंग उर्फ सिप्पी ठाकूर आणि देवेंद्रसिंग ठाकूर, तिघेही रा. पुराईहार, जि. कानपूर, उत्तर प्रदेश अशी सांगण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपी ज्या वाहनातून पसार झाले, त्यामध्ये चाकू व दोरी असल्याचेही पकडलेल्या आरोपींनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार पदमसिंह कांबळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६८/२०२६, कलम ३१०(४) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये दरोड्याची तयारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने आणि पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक इरफान सय्यद व गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार पदमसिंह कांबळे, कालो, काकडे, बालाजी यादगीरवाड व यमलवाड यांनी केली.
