शेतीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ज्ञानेश्वर जाधव, गजानन जाधव यांच्यासह आठ जणांवर गुन्हा

 

मुदखेड (प्रतिनिधी) – शेतीच्या वादातून तरुणाला अडवून लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री मुदखेड शहरातील खुजडा चौक परिसरात घडली. या प्रकरणी कैलास दादाराव पवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिसांनी ज्ञानेश्वर जाधव आणि गजानन जाधव यांच्यासह अन्य पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी कैलास पवळे (वय ३०, रा. येळेगाव, ता. उमरी) हे शेती व्यवसाय करतात. १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ते खुजडा चौक परिसरात गेले असता, त्यांना ज्ञानेश्वर जाधव व गजानन जाधव यांनी अडविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर अन्य व्यक्तींनी संगनमत करून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे.

आरोपींनी लोखंडी रॉड, काठी तसेच लाथाबुक्क्यांनी डोक्यावर, हातावर, पायावर व शरीराच्या इतर भागांवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात कैलास पवळे यांच्यासह अन्य व्यक्तींनाही दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 156/2026 नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3), 324(1), 118(1), 351(2) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक धीरज दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची ओळख पटविण्यासह घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!