शाहरुख खान हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात आई आणि सहा भाऊ आहेत. वर्ष २०१० मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच विशेष दलात सहभागी होऊन कमांडो बनण्याचे आणि देशाची सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वर्ष २०१७ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) प्रवेश केला. त्यानंतर अत्यंत कठीण निवड प्रक्रियेतून त्यांची नक्षलविरोधी कारवायांसाठी विशेष ओळख असलेल्या कोब्रा बटालियनमध्ये निवड झाली.

जानेवारी २०२३ मध्ये झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानादरम्यान नक्षलवाद्यांकडून गोळीबार आणि स्फोट करण्यात आला. या हल्ल्यात शाहरुख खान यांच्या हाताला दोन गोळ्या लागल्या. गंभीर जखमी असूनही त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी धैर्याने नक्षलवाद्यांचा सामना केला आणि आपल्या पाच सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या या शौर्याची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांची पराक्रम पदकासाठी निवड करण्यात आली असून, ताम्रपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.नांदेडच्या मातीतून घडलेला हा जवान देशसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. जखमी अवस्थेतही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या शाहरुख खान यांच्या शौर्याचा नांदेडकरांना अभिमान आहे. देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित असलेल्या या वीर जवानाला मिळालेला सन्मान हा संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.
