सलग सहाव्या वर्षी ICMR शिष्यवृत्तीवर नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मोहोर

दोन MBBS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिष्यवृत्तीसाठी निवड;संशोधन संस्कृतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची भक्कम साथ

 

नांदेड –  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेडने वैद्यकीय शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात आणखी एक मानाची कामगिरी नोंदवली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्या प्रतिष्ठित ICMR-STS संशोधन शिष्यवृत्तीसाठी यंदा महाविद्यालयातील द्वितीय वर्ष MBBSचे विद्यार्थी सद्भाव दीपक भुरे आणि कु. तरुशी सिवाच यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयाने सलग सहाव्या वर्षी ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळविण्याची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून हजारो संशोधन प्रस्ताव सादर होत असताना ICMR-STS शिष्यवृत्तीसाठी निवड होणे हे विद्यार्थ्यांच्या संशोधन कौशल्याची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि बौद्धिक क्षमतेची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल मानली जाते. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग सहा वर्षे हे यश संपादन करणे ही संपूर्ण प्रदेशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक विचारसरणी आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. नियमित अभ्यासासोबत संशोधन, वैज्ञानिक सादरीकरणे आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयात संशोधनाभिमुख वातावरण निर्माण करण्यात आले असून, त्याचेच हे फलित असल्याचे अधिष्ठात्यांनी नमूद केले.या यशामध्ये उपअधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले आणि डॉ. शितल राठोड यांचेही विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

या उपक्रमात जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख तथा मेडिकल रिसर्च सेलचे नोडल अधिकारी डॉ. आय. एफ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना संशोधन विषयाची निवड, अभ्यासाची रचना, माहिती संकलन, सांख्यिकीय विश्लेषण आणि संशोधनातील नैतिक बाबी यांसह संपूर्ण संशोधन प्रक्रियेत सातत्याने मार्गदर्शन केले. तसेच विभागातील डॉ. आर. डी. गाडेकर, डॉ. कोमल वारकड, सानिया ऐमन आणि साईनाथ मैदपवाड यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षकांनी नियमित अध्यापन, प्रात्यक्षिके आणि क्लिनिकल जबाबदाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रस्तावांवर अतिरिक्त वेळ देऊन केलेल्या अथक परिश्रमांमुळे ही यशाची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

शिक्षकांचे अथक परिश्रम

यशामागील खरी शक्ती :ICMR शिष्यवृत्तीच्या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत निश्चितच आहे. मात्र त्या मेहनतीला योग्य दिशा देणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना तितकेच महत्त्व आहे. डॉ. वैशाली इनामदार, डॉ. वंदना दुधामल, डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. हुमेरा खान, डॉ. संजयकुमार मोरे, डॉ. एम.ए. समीर, डॉ. चंडालिया, डॉ. उबेद खान, डॉ. अंजली देशमुख, डॉ. कपिल मोरे, डॉ. फारुखी, डॉ. किशोर राठोड, डॉ. सलीम तांबे, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ. गजानन सुरेवाड, डॉ. कापसे, डॉ. झांगडे, डॉ. प्रदीप बोडके, डॉ. उमेश अत्राम, डॉ. मनोज हरनाळीकर, डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. देगावकर, डॉ.केळकर, डॉ. अतिश गुजराथी, डॉ. अतुल राउत, डॉ. अमित पंचमहालकर, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावार, डॉ.अजय वराडे, डॉ. जे.बी देशमुख, डॉ.पंकज कदम, हे सर्व दिग्गज अध्यापक नियमित अभ्यास, प्रात्यक्षिके, क्लिनिकल पोस्टिंग, परीक्षा आणि इतर शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळून संशोधन प्रकल्पावर काम करणे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती मध्ये मार्गदर्शन करत असतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देऊन त्यांच्या संशोधन प्रस्तावांवर चर्चा करणे, चुका दुरुस्त करणे, संशोधनाची गुणवत्ता वाढविणे आणि त्यांना सातत्याने प्रेरित करणे हे शिक्षकांसाठीही मोठे आव्हान असते. परंतु महाविद्यालयातील शिक्षकांनी ही जबाबदारी केवळ कर्तव्य म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या निर्मितीची संधी म्हणून स्वीकारली आहे. त्यातूनच ICMR शिष्यवृत्तीच्या यशाची ही सातत्यपूर्ण मालिका निर्माण झाली आहे.

ICMR शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सक्षम होतो. भविष्यात पदव्युत्तर शिक्षण, अध्यापन, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ही कौशल्ये त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील ही सलग सहा वर्षांची यशोगाथा केवळ शिष्यवृत्तीपुरती मर्यादित नसून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण, समर्पित शिक्षक आणि संशोधनाभिमुख विद्यार्थी घडविण्याच्या संस्थात्मक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!