तीन बैलांची सुटका; वाहनासह ७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
लोहा (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध व क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनावर लोहा पोलिसांनी कारवाई करत तीन बैलांची सुटका केली. या कारवाईत पिकअप वाहनासह एकूण ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १५ ऑगस्ट रोजी सुनेगाव परिसरात करण्यात आली.
लोहा पोलीस ठाण्याचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना सुनेगाव येथे गुप्त बातमीदारामार्फत एमएच-२२-एएन-०३१० क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनातून बैलांना भरून कंधारच्या दिशेने नेले जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी सुनेगाव येथे वाहनाचा शोध घेत ते रस्त्याच्या बाजूला थांबवून तपासणी केली. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये तीन बैलांना कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळले. अशा पद्धतीने वाहतूक केल्यामुळे बैलांना वेदना व यातना होऊन इजा होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच तिन्ही बैलांच्या कानाला एअर टॅग नसल्याचेही आढळून आले. कारवाईत एका तांबड्या बैलाची किंमत अंदाजे ६० हजार, लाल रंगाच्या बैलाची ५० हजार आणि पांढऱ्या बैलाची ४५ हजार रुपये, तर महिंद्रा पिकअप वाहनाची किंमत अंदाजे सहा लाख रुपये असा एकूण ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजू माधवराव गिते (वय ४४, व्यवसाय चालक, रा. बाबुळगाव, ता. कंधार, जि. नांदेड) याच्याविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुरनं. २९३/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५(अ), ५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोहा पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेख तसेच पोलीस अंमलदार परसराम लुंगारे यांच्या पथकाने केली.