कासारखेडा येथील श्री पंचमुखी शेतकरी गटाच्या सामूहिक श्रमदानातून १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता
नांदेड – सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील श्री पंचमुखी शेतकरी गटाने सामूहिक श्रमदानातून गिरिजा नदीवर वनराई बंधारा उभारला आहे. सिमेंट व बियाण्यांच्या रिकाम्या पोत्यांचा वापर करून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यात सुमारे १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. या बंधाऱ्याचे जलपूजन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी श्री पंचमुखी शेतकरी गटाने राबविलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली. यामध्ये इर्जीक पद्धतीने २०० लिटर दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक, गांडूळ खत निर्मितीसाठी १३ व्हर्मी बेडची उभारणी, परसबाग निर्मिती, वनराई बंधारा, जलतारा प्रकल्प, वृक्षलागवड तसेच सोयाबीन पिकातील एसओपीची अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
गावकऱ्यांनी लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे जलपूजन तसेच मृदेचे ‘काळ्या आई’ म्हणून पूजन करण्यात आले.
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी शेतकरी गटाने उभारलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून गटातील एकजूट आणि उत्कृष्ट समन्वयाचे कौतुक केले. “सकारात्मक ऊर्जा घेऊन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरावर पारितोषिक मिळवावे,” अशा शुभेच्छा त्यांनी गटाला दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी गटाने आपल्या बांधावर जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा उभारावी, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सीड बँक तयार करून घरगुती बियाण्यांचा वापर, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, पॅकिंग आणि गटाच्या ब्रँड नावाने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवावे, असे आवाहन केले.
कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी सोयाबीन उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबी समजावून सांगितल्या. फार्मर कप स्पर्धेतील गुणांकनासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच गटातील प्रत्येक सदस्याने राबविलेल्या उपक्रमांची माहिती ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी व त्याचा शेतीमध्ये अवलंब करावा, असे आवाहन केले. शास्त्रज्ञ डॉ. माणिक कल्याणकर यांनी पिकांवरील विविध रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी शेतकरी गटांनी अवजार बँक व गोडाऊन उभारणीसाठी अर्ज करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच बांधावर फळझाडांची लागवड करून वृक्षसंवर्धनाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले.

पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांनी स्मार्ट शेती ॲपवर इर्जीक व एसओपीची अंमलबजावणी कशा पद्धतीने नोंदवावी, याबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारिकोटे यांनी दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक करून त्याचे पीक संरक्षणातील महत्त्व स्पष्ट केले. गटाने यापूर्वी तयार केलेल्या दशपर्णी अर्काच्या फवारणीचे चांगले परिणाम मिळाल्याने पुन्हा २०० लिटर दशपर्णी अर्क तयार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. माणिक कल्याणकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, कृषी भूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी भगवानभाई इंगोले, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी संजय सूर्यवंशी, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी कैलास पेरके यांनी केले. गटाचे निमंत्रक शिवदास कडेकर यांनी गटाने राबविलेल्या एसओपीची माहिती दिली. शेषेराव हिंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पंचमुखी शेतकरी गटाचे मार्गदर्शक तानाजी शिंदे, मेंटॉर संतोष कडेकर यांच्यासह गटातील सर्व सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
सामूहिक श्रमदान, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम घडवून आणणारा श्री पंचमुखी शेतकरी गटाचा हा उपक्रम इतर शेतकरी गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
