• पीक कापणी प्रयोगात पारदर्शकतेवर भर • पूर्ण नुकसान झालेल्या पिकांसाठी ‘शून्य उत्पादन’ची तरतूद • प्रयोग वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्याचे आवाहन नांदेड (जिमाका) – जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी मुदतपूर्व पीक काढणी, पीक मोडणे अथवा जाळून टाकणे असे निर्णय घेत आहेत. मात्र, अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक कापणी, काढणी किंवा नांगरणी करू नये आणि नियोजित पीक कापणी प्रयोगास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार महसूल मंडळ व तालुका स्तरावरील पिकांचे उंबरठा उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पादनातील घट निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणारी आकडेवारी महत्त्वाची ठरते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण अथवा गट क्रमांकावरील प्लॉटची निवड पीक कापणी प्रयोगासाठी झाली आहे, त्यांनी संबंधित प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक काढणी अथवा नांगरणी करू नये. यामुळे वस्तुनिष्ठ पद्धतीने नुकसान व उत्पादन घट निश्चित करण्यास मदत होणार आहे. पीक कापणी प्रयोगांमध्ये मानवी हस्तक्षेप किंवा त्रुटी राहू नयेत, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रयोगाची छायाचित्रे व आवश्यक माहिती सीसीई ॲपवर अपलोड करण्यात येते. प्रयोगात पारदर्शकता राहावी यासाठी प्रत्यक्ष शेतावर होणारा प्रत्येक पीक कापणी प्रयोग महसूल, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांच्या संयुक्त उपस्थितीत पूर्ण केला जात आहे. दुष्काळ अथवा पावसाअभावी पीक पूर्णपणे वाळून गेले किंवा नष्ट झाले असल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामस्तरीय समितीमार्फत ‘मुदतपूर्व पाहणी व शून्य उत्पादन पंचनामा’ (Zero Yield Report) करण्याची तरतूद आहे. त्याची नोंद सीसीई ॲपवर करण्यात येते. त्यामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोगापूर्वी मुदतपूर्व कापणी करू नये. नियोजित पीक कापणी प्रयोगासाठी निश्चित केलेल्या प्लॉटची ठरविलेल्या तारखेपूर्वी कापणी केल्यास संबंधित महसूल मंडळ अथवा तालुक्याच्या उत्पादनाची आकडेवारी निश्चित करण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोग पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या सर्वेक्षण अथवा गट क्रमांकांवर नियोजित पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रयोगाचे काम अपूर्ण राहिल्यास किंवा त्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण झाल्यास संबंधित महसूल मंडळाच्या पीक विमा भरपाई प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पीक कापणी प्रयोग वेळेत आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 18 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत महिला शेतकऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी