सुखबीर सिंह बादल हे आपल्या कुटुंबीयांसह (पत्नी, माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर आणि दोन मुली) नांदेडमध्ये दोन दिवसासाठी आले आहेत. नांदेडमधील विविध गुरुद्वारांचे दर्शन घेण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. गुरुवारी सकाळी ते गुरुद्वारा मातासाहिब येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी १. ३० ते पायऱ्यांवरून खाली येत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर खंजीराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हल्लेखोर बादल यांच्या दिशेने येत असताना तो सरेंडर सरेंडर असे ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याच्याकडे खंजीर असल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. नांदेड एसपीयूचे अधिकारी संतोष केंद्रे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराला पकडण्यासाठी धाव घेतली आणि त्याच्यावर झडप घातली. त्यांच्या धाडसी हस्तक्षेपामुळे हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले.
मात्र, या झटापटीदरम्यान हल्लेखोराच्या हातातील खंजीर बादल यांच्या उजव्या हाताला लागल्याने त्यांना दुखापत झाली. हल्लेखोराला पकडताना पोलीस अधिकारी संतोष केंद्रे हे देखील जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
सुखबीर सिंह बादल यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असतानाही हा प्रकार घडल्याने सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या सुरक्षा पथकाने हल्लेखोराला जवळ येण्यापूर्वीच रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रसंगावधान राखून संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, त्याने हा हल्ला पूर्वनियोजित केला होता का आणि त्याच्यामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीबाबत सध्या चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत असून, वैद्यकीय उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
एसीपीयु विभागाचे जखमी पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे ..

