राष्ट्रध्वज स्थळासमोर अस्वच्छता, रस्त्यावर जलजमाव; शुद्ध पाण्याचीही समस्या हिमायतनगर – हिमायतनगर तालुक्यातील वटफळी ग्रामपंचायतीमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रध्वज स्थळासमोरील अस्वच्छता, मुख्य रस्त्यावर चिखल व जलजमाव, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा नसणे, नाल्यांची दुरवस्था, अतिक्रमण तसेच ARO/RO फिल्टरची सुविधा उपलब्ध असूनही शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळत नसल्याच्या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी दीपक पाटील, वटफळीकर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, हिमायतनगर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टपूर्वी स्वच्छतेची मागणी वटफळी गावातील राष्ट्रध्वज स्थळासमोर घाण, चिखल आणि पाणी साचत असल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी वाहत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी याच मार्गावरून प्रभात फेरी काढून राष्ट्रध्वज स्थळी पोहोचणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वी रस्त्याची व राष्ट्रध्वज स्थळाची स्वच्छता करून सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षीही याच समस्यांच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण करण्यात आले होते. मात्र, वर्षभरानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने या समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा करण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा हवा गावातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने विविध ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे नाल्यांची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करून पावसाच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक रस्ते, नाल्या व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची पाहणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. फिल्टर असूनही शुद्ध पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये ARO/RO फिल्टरची सुविधा उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणेची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि ग्रामस्थांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रध्वज स्थळ, मुख्य रस्ता, नाल्या व पाणीपुरवठा यासंबंधीच्या समस्या तातडीने सोडवून १५ ऑगस्टपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करावीत. तसेच मागील वर्षापासून समस्या कायम का आहेत, याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दीपक पाटील, वटफळीकर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून संबंधित विभागांना वेळबद्ध कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 664 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटधारकाची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा पोलिसांची दोन जुगार अड्डयावर धाड; 16 आरोपींना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त