पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून जिल्ह्यातील विविध गावांतील पीक परिस्थितीची पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा

नांदेड (जिमाका), दि. 27 : राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज दिली.
पालकमंत्री अतुल सावे यांनी आज हदगाव तालुक्यातील जगापूर व तामसा, भोकर तालुक्यातील हळदा व मोघाळी, उमरी तालुक्यातील सोमठाणा, नायगाव तालुक्यातील पळसगाव आणि नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी, विशेषतः महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.
राज्य शासन या संकटात शेतकऱ्यांसोबत असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर देत पालकमंत्री सावे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच, सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही ट्रिगर-2 अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अहवाल घेतला असून, या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यात जगापूर व सोमठाणा येथे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, हळदा व मोघाळी येथे खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण, पळसगाव येथे आमदार राजेश पवार, तर तुप्पा येथे आमदार आनंदराव तिडके-बोंढारकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.या पीक परिस्थिती पाहणी दौऱ्यावेळी संबंधित गाव परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!