हल्लीचे काही पोलीस जाम अपडेटेड झाले आहेत. प्रत्यक्ष पैसे घ्यायला भीती वाटते, म्हणून त्यांनी आता फोन पे चा आधार घेतला आहे. आता हा फोन पे नंबर स्वतःचा आहे की दुसऱ्या कोणाचा, हे शोधण्याचे कोडे अजून तरी सुटलेले नाही.
नांदेड पोलीस मुख्यालयाचे भाग्यविधाते राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे साहेब तर गेल्या पाच वर्षांपासून इथे असे पाय रोवून बसलेत की जणू काही मुख्यालय त्यांची खाजगी मालमत्ताच!. विशेष म्हणजे, सरकारकडून घरभाडे भत्ताही लाटायचा आणि राहण्यासाठी चक्क शासनाने कंडम (अपात्र/पडके) घोषित केलेल्या घरातच मुक्काम ठोकायचा, अशी दुहेरी कमाई करण्याची किमया केवळ धोंडगे साहेबच करू शकतात.या बाबतची माहिती जुन्या लाईन इंचार्ज कडे आहेच. आताचे लाइन इंचार्ज सांगतील की नाही हे जरा अवधड आहे. पण जुने इंचार्ज सांगतीलच. हा मोदक व्यवसाय विमानतळातून मुख्यालयात आलेल्या पोलीस अंमलदाराच्या स्वाधीन आहे.
मुख्यालयाची खरी गंमत तर मोदक प्रसादात दडलेली आहे. कागदावर ८९० पोलिसांची फौज असताना प्रत्यक्षात मात्र केवळ १५ ते २० किंवा जास्त सुद्धा `लोकच कामावर दिसतात. बाकीचे ८५० हून अधिक पोलीस कुठे गायब होतात? तर त्याचे गुपित १० ते १५ मोदकांच्या प्रसादात आहे. हा नैवेद्य चढवला की, पोलिसांना नोकरीवर हजर राहण्याची गरजच भासत नाही.
केवळ ड्युटीच नाही, तर वायरलेस यंत्रणेतल्या टेकड्यांवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसण्यासाठी दरमहा ४ मोदकांचा हप्ता ठरलेला आहे. इतकेच काय, गार्डच्या ड्युटीवर जाण्यासाठी सुद्धा ४ मोदक प्रसाद द्यावा लागतो. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वतः काही पोलिसांच्या संलग्न बदल्यांचे आदेश केले आहेत, जोपर्यंत मोदकाचा नैवेद्य मिळत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची मुख्यालयातून सुटका होत नाही.पण ते कर्मचारी सुद्धा मोदक प्रसाद चढवण्यास तयार नाहीत त्याचे कौतुकच करायला हवे.
एकूणच काय, तर पोलीस अधिक्षकांच्या आदेशापेक्षा मोदकांचामहिमा मोठा ठरत आहे. दिव्याखालचा अंधार दिसत नसतो ही म्हण सध्या नांदेड पोलीस मुख्यालयात तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. आता डॉ. नीलाभ रोहन या आपल्या घराजवळचा हा भयंकर अंधार दूर करणार का, की मोदकांचा हा बाजार असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
