नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं, पण ज्या मातेने नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून या जगाचे दर्शन घडवले, त्याच मातेचा संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाने क्रूरपणे अंत केल्याची सुन्न करणारी घटना लोहा तालुक्यातील वाघदरवाडी येथे घडली आहे. बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसारखे उच्च शिक्षण घेतलेल्या नृसिंह बालाजी केंद्रे याने आपल्याच मातेची हत्या केली असून, कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.पी. कुलकर्णी यांनी त्याला आता मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. काय आहे संपूर्ण घटना? ही हृदयद्रावक घटना २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास बैलवाडी शिवारातील शेतात घडली. फिर्यादी बालाजी केंद्रे (एक निवृत्त शिक्षक) हे रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांची पत्नी गंगाबाई या घराबाहेर बाजेवर झोपलेल्या होत्या. मध्यरात्री अंदाजे २:३० वाजेच्या सुमारास आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून वडील धावत आले असता, त्यांना पोटचा मुलगा नृसिंह हा हातात लोखंडी कत्ती घेऊन स्वतःच्या आईवर वार करताना दिसला. माझं वय वाढलंय, माझं लग्न होत नाही, तुम्ही मला नोकरी लावण्यासाठी पैसे खर्च करत नाही आणि जमीन माझ्या नावावर का करत नाही? अशा क्षुल्लक कारणावरून आणि संपत्तीच्या रागातून त्याने हा रक्ताचा खेळ खेळला. उच्च शिक्षण ठरले निष्फळ आरोपी नृसिंह केंद्रे हा पुण्यातील निगडी येथून बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण होता. समाजात सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका तरुणाने केवळ संपत्ती आणि पैशांच्या हव्यासापोटी आपल्या जन्मदात्रीच्या डोक्यावर, छातीवर आणि हातावर सपासप वार करून तिला मृत्यूच्या दारात ढकलले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंगाबाईंना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. न्यायाचा विजय या प्रकरणात माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास आणि पुराव्यांची साखळी तयार करून माळाकोळीचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी कंधार न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. त्या आधारे जिल्हा न्यायाधीश ए. पी. कुलकर्णी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी नृसिंह केंद्रे याला दोषी ठरवले. सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता ॲड. महेश कागणे यांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.माळाकोळीचे पोलीस अंमलदार बी. एस. पारदे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पूर्ण केले. उच्च शिक्षण माणसाला सुसंस्कृत बनवते, असे म्हटले जाते. मात्र, या घटनेने केवळ नांदेड जिल्हाच नव्हे, तर माणुसकीला मान खाली घालायला लावली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी एका उच्चशिक्षित मुलाने आपल्याच आईचा जीव घेऊन नात्यांमधील ओलावा आणि विश्वासाला कायमचा तडा दिला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी प्रकरणाचे तपासिक अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार आणि प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी माळाकोळी पोलिसांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 990 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार: पोटच्या चिमुरड्यांच्या जिवासाठी एका मातेचा अघोरी प्रथेविरुद्ध लढा;सहा जणांवर गुन्हे दाखल संसदेत शहा विरुद्ध राहुल युद्ध: विद्यार्थ्यांवरील गोळीबाराचा हिशोब कोण देणार?