लोहा ( प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात सोमवारी मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. या वादातून विशालने रागाच्या भरात पत्नी अर्चनावर विनापरवाना गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तिच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत घुसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला तातडीने नांदेडला हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने पुरावे संकलित केले आहेत. फरार आरोपी विशालवर यापूर्वी मे २०२५ मध्ये पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत.
लोहा शहरात थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरातील वाढता अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारीवर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोहा शहरात थरार: कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार; आरोपी पती फरार
