नांदेड (विशेष प्रतिनिधी)- पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नांदेडमध्ये नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली असून, आरोपीला नांदेड न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पंजाबला नेण्यात आले आहे.
नेमकी घटना काय? ९ मे २०२६ रोजी मध्यरात्री पंजाब राज्यातील उत्तर धारीवाल जिल्ह्यात क्यू आर टी पथक गस्त घालत असताना, त्यांना सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानच्या दिशेने आलेले एक संशयास्पद ड्रोन दिसले . पोलिसांनी तत्परता दाखवत ते ड्रोन खाली पाडले. या ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केली जात होती. झडती घेतली असता, त्यामध्ये एकूण ११.७६० किलो वजनाचे अमली पदार्थ सापडले. हे अमली पदार्थ छोट्या-छोट्या १० पाकिटांमध्ये विभागलेले होते.
आरोपीचा थरारक पळ: ज्यावेळी हे ड्रोन खाली उतरले, तेव्हा तिथे हे अमली पदार्थ नेण्यासाठी जुगराज सिंघउर्फ गोलू किकर सिंघढिल्लो हा आरोपी आला होता. पोलीस आल्याचे लक्षात येताच त्याने आपली गाडी तिथेच सोडली आणि अंधाराचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला. पंजाब पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली होती, मात्र आरोपीचा शोध सुरू होता.
नांदेडमध्ये कारवाई: पंजाब पोलिसांना तपासादरम्यान आरोपी नांदेडमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यपाल यांच्या नेतृत्वाखालील पंजाब पोलिसांचे पथक नांदेडला पोहोचले. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची भेट घेऊन माहिती दिली. यानंतर डॉ. नीलाभ रोहन यांनी आपल्या खास पथकाला तपासात सहभागी करून घेतले. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी मिळून सलग दोन ते तीन दिवस संशयित आरोपीवर पाळत ठेवली.
अखेर ४ जुलै रोजी शनिवारी पोलिसांनी सापळा रचून जुगराज सिंघला ताब्यात घेतले. तो मूळचा पंजाबच्या पोलीस ठाणे सराई हद्दीतील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. नांदेड न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची प्रवास पोलीस कोठडी (Transit Remand) मंजूर केली. त्यानंतर पंजाब पोलीस आरोपीला घेऊन पुढील तपासासाठी पंजाबकडे रवाना झाले आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी डॉ.नीलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल घोगरे,हरजिंदरसिंघ चावला,तुकडे,महेश कोरे पोलीस अंमलदार गुरदीपसिंघ कालरा,राजू बोधगिरे,साहेबराव शिंदे,गोविंद राठोड,गणेश यादव,संजय राठोड,विश्वनाथ पवार पथकाचे कौतुक केले आहे.
