नांदेड(प्रतिनिधी)- वारसा हक्काने मिळालेला प्लॉट बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडपल्याप्रकरणी नांदेडमधील वजीराबाद पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी चक्क न्यायालयाची बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नेमके प्रकरण काय? तक्रारदार लक्ष्मीकांत अनंतराव जोशी यांचे मामा दिवंगत गंगाधर माधवराव पांडे यांचे ७ मे २०२१ रोजी निधन झाले. त्यांना अपत्य नसल्याने त्यांचे लक्ष्मीकांत जोशी यांच्यासह एकूण सात वारसदार होते. मात्र, या वारसदारांपैकी वसंतराव अनंतराव जोशी आणि मनोज अनंतराव जोशी यांनी इतर वारसदारांना डावलून बनावट वारसा प्रमाणपत्र तयार केले. या फसवणुकीसाठी आरोपींनी हदगाव न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीश सुगंधा जी. पांडे यांची खोटी स्वाक्षरी आणि न्यायालयाचा बनावट शिक्का वापरला. २०० रुपयांच्या बाँड पेपरवर हे प्रमाणपत्र तयार करून, त्या आधारे गणेश नगर गृहनिर्माण संस्थेतील १६७.२८ चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट (क्र. १४७/ब) आपल्या नावे करून घेतला. या कामात भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. राजकीय दबावाचा आरोप आणि न्यायालयीन लढा तक्रारदार लक्ष्मीकांत जोशी यांनी १२ जून २०२५ रोजी वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, आरोपींचे मोठ्या राजकीय पक्षाशी लागेबांधे असल्याने पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून जोशी यांनी ॲड. आकाश लाडे आणि इतर वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली. प्रथम वर्ग न्यायाधीश ए. जी. चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे आता भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात वजीराबाद पोलीस आता पुढील तपास करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,222 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पाकिस्तानच्या ड्रोन तस्करीचा पर्दाफाश; ११ किलो अमली पदार्थांच्या प्रकरणी पळालेल्या आरोपीला नांदेडमध्ये अटक राम मंदिर ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह;पुन्हा वादग्रस्त नियुक्ती