नांदेड विद्यापीठात खळबळ: पीएचडी धारक विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज एका ३८ वर्षीय विद्यावाचस्पती (पीएचडी) प्राप्त विद्यार्थ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मयत व्यक्तीचे नाव राहुल मुकुंदराव सोनाळे (वय ३८) असून ते नवजीवन नगर, स्वयंवर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणारे होते. प्राप्त माहितीनुसार, राहुल यांनी आज सकाळी विद्यापीठातील भाषा संकुलासमोर असलेल्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.

या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस तपासात घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडलेली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. राहुल हे उच्चशिक्षित असून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली होती, अशा व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!