या ऐतिहासिक सोहळ्यामुळे मराठवाडा, विदर्भ, मुंबई तसेच उत्तर भारतातील उत्तराखंड परिसराशी रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार असून प्रवासी, भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः शीख धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराला देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अधिक सोयीची ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
नांदेड रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर तसेच महापौर कविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजयकुमार श्रीवास्तव, रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांच्यासह भारतीय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांनी रेल्वे सेवांच्या विस्तारामुळे नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले. मुंबईसह उत्तर भारताशी थेट रेल्वे संपर्क वाढल्याने व्यापार, उद्योग, शिक्षण, पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात नांदेडसाठी आणखी रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमानंतर मान्यवरांनी रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण होते. प्रवाशांनी आणि नागरिकांनी नव्या रेल्वे सेवांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. अनेकांनी या रेल्वे सेवेमुळे प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत होणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
या दोन्ही रेल्वेगाड्यांच्या प्रारंभामुळे नांदेड शहराच्या रेल्वे नकाशावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना रेल्वे प्रशासनासह नागरिकांनी व्यक्त केली.
