नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांच्या तक्रारींना तातडीने न्याय मिळावा आणि पोलीस-जनता संवाद अधिक प्रभावी व्हावा या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातून नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळत असल्याने या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
दि. ३० जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी एकूण ३९ तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतः ऐकून घेतल्या. या तक्रारींमध्ये दिवाणी वाद, मालमत्ता विषयक प्रश्न, दखलपात्र गुन्हे, मारहाण, सायबर फसवणूक तसेच इतर विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता.
प्राप्त तक्रारींची सविस्तर सुनावणी करून संबंधित विभागातील पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तक्रारींचे गुणवत्तापूर्ण व वेळेत निराकरण व्हावे यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणाही कार्यरत असून प्रत्येक अर्जावर वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
