
नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत. निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत पार पडली. त्यासाठी निवडणूक कार्यालयाने काटेकोर नियोजन केले होते. निवडणूक प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्तासह, मतदान प्रक्रियेवर वेब कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती. मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली होती. निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी नांदेड, बिलोली, हदगाव, भोकर, धर्माबाद या मतदान केंद्रास भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनीही नांदेड मतदान केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली.

सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी 10 वाजेपर्यत 4.87 तर दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात 56.86 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत 88.94 टक्के मतदान झाले. अंतिमतः दुपारी 4 वा. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या 452 मतदारांमध्ये 228 मतदार पुरूष तर 224 मतदार स्त्रिया होत्या. त्यातील 228 पुरूष मतदारांनी तर 223 स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जमा करून, त्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. या स्ट्राँगरूमवरही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने सांगितले.

मुदखेडच्या काँग्रेस नगरसेविका नाजेमाबेगम बंदे अली खाॅ पठाण या हज यात्रेला गेल्या होत्या. नियोजना प्रमाणे आज परत येणार होत्या परंतु ऐनवेळी विमान रद्द झाल्याने त्यांना परत येता आले नाही.म्हणून विधान परिषद मतदार संघात एक मतदान कमी झाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकित जिल्ह्यात ४५२ पैकी ४५१ मतदान, एकमेव मतदार गैरहजर
