दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा उलगडा; पत्नीसह दोन आरोपी जेरबंद
नांदेड (प्रतिनिधी)- मरखेल पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा (Blind Murder Case) उलगडा करत पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलाच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकिशन गंगाधर गोलेवार (वय 55, रा. एकुर्का रोड, ता. उदगीर, जि. लातूर) हे 25 एप्रिल 2026 पासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नी देवशाला रामकिशन गोलेवार यांनी 17 मे 2026 रोजी मरखेल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हे प्रकरण केवळ मिसिंगचे वाटत असले तरी तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या.
चौकशीदरम्यान देवशाला गोलेवार हिचे गावातील सुभाष व्यंकन्ना यतरवाड याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासले असता सतत संपर्कात असल्याचे उघड झाले. मात्र रामकिशन बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात अचानक खंड पडल्याचे निदर्शनास आले. तपास अधिक खोलात नेत पोलिसांनी तांत्रिक पुरावे, स्थानिक गुप्त माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे यांची सांगड घातली. अखेर पोलिसांनी देवशाला गोलेवार हिची कसून चौकशी केली असता तिने पती रामकिशन गोलेवार यांचा प्रियकर सुभाष यतरवाड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी दाखवून दिलेल्या ठिकाणी उत्खनन करून मृतदेहाचे अवशेष, मानवी सांगाडा तसेच अन्य पुरावे हस्तगत केले. घटनास्थळावरून खुनात वापरलेला दगड, कपडे आणि डीएनए नमुनेही जप्त करण्यात आले. या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 100/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103, 238 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवशाला रामकिशन गोलेवार (वय 40) व सुभाष व्यंकन्ना यतरवाड (वय 45) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर,पोलीस उप निरीक्षक विलास पवार,पोलीस अंमलदार परशुराम इंगोले,सचिन गीरे,नारायण यंगाळे,परमेश्वर बेलकर,संदीप बोदनवाड, व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशस्वी तपासामुळे केवळ मिसिंग म्हणून समोर आलेल्या प्रकरणामागील खुनाचे गूढ उलगडले असून तांत्रिक विश्लेषण, मानवी गुप्त माहिती आणि फील्ड पोलिसिंग यांच्या प्रभावी संगमाचे हे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.
