आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी गझलेचा सन्मान
नांदेड (प्रतिनिधी)-मॉरिशस येथे पार पडणार्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनात होणार्या गझल मुशायरा व कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी नांदेडचे कवी बापू दासरी यांची निवड करण्यात आली आहे, असे आयोजकांनी नुकतेच जाहीर केले आहे.
गेल्या ४० वर्षापासून मराठी गझल चळवळीत बापू दासरी यांचे सक्रीय योगदान असून, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक काव्यमैफिली शासकीय कार्यक्रम व गझल मुशायर्यांचे बहारदार सूत्रसंचालन करण्याचा लौकिक बापू दासरी यांच्या नावावर आहे. तसेच गेल्या अकरा वर्षापासून नांदेड येथे पार पडणार्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या यशस्वीतेत त्यांचा वाटा असून ते दिवाळी पहाटच्या समितीचे अध्यक्ष आहेत. बापू दासरी यांनी लिहिलेल्या लावणीला आनंद शिंदे यांनी संगीत दिले असून सुरेखा पुणेकरांनी खास शैलीत साखरपुड्याची लावणी गायली म्हणून रसिकांनी त्याचे स्वागत केले आहे. नुकतेच डिसेंबरमध्ये पार पडलेल्या हेमलकसा येथील पहिल्या मराठी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद दासरींनी भूषविले असून, त्या संमेलनात डॉ. प्रकाश आमटे यांना जीवनगौरव पुरस्कार बापूदासरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता हे विशेष! राजपत्रित अधिकारी पदावर काम करून देखील कविता गझल साहित्य यामुळे बापू दासरी यांना सिद्ध हस्तलेखक म्हणून संबोधल्या जाते. दोन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांच्या नावावर आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये मतदार जागृती अभियानात दासरींनी लिहिलेले मतदानाचे गाणे राज्यभरामध्ये शासकीय स्तरावर गौरविल्या गेले.
राजहंस प्रकाशनाने नुकताच बापू दासरींचा मातृ सुक्त हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून, साहित्य भारती या विख्यात साहित्यिक चळवळीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. कलांगण प्रतिष्ठान, ललित कला प्रतिष्ठान या सांस्कृतिक संस्थांचे दासरी हे पदाधिकारी असून, दिव्यांग कल्याण आणि जेष्ठ नागरिकांचे कल्याणाच्या चळवळीत देखील ते सक्रिय आहेत. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे सुद्धा ते सदस्य आहेत. अनेक नवीन गझलकरांना गझल कार्यशाळेत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मॉरिशसच्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या गझल मुशायरा व कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे बापू दासरी
