विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांची गोवा सहल चर्चेत; व्हायरल व्हिडिओंमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

 

देगलुर (प्रतिनिधी):- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गोवा सहल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा आणि नृत्य करतानाचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नागरिकांमधूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

देगलुर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून नगराध्यक्ष विजयमाला टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई यांच्यासह नगरसेवक अनिल बोनलावार, सुमंत कांबळे, बबलू टेकाळे, मोईनोद्दीन, संतोष नारलावार, शोभा कडलवार, मीनाक्षी कांबळे, रोहिणी मैलागिरे, द्याडे, तोटावार आणि कौरवार यांच्यासह अन्य सदस्य गोवा सहलीसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. या सहलीत काही नगरसेवकांचे कुटुंबीय आणि प्रतिनिधीदेखील सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर आधारित होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सहल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या काळात नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी किंवा राजकीय हालचालींपासून दूर ठेवण्यासाठी विविध पक्षांकडून सहलींचे आयोजन केल्याच्या चर्चा यापूर्वीही झाल्या आहेत. त्यामुळे या सहलीकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

गोव्यातील एका बीचवर काही सदस्य व त्यांच्या प्रतिनिधींचे नृत्य आणि मनोरंजन करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी हा त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे, तर अनेकांनी शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना लोकप्रतिनिधींनी अशा मौजमजेपेक्षा जनतेच्या कामांकडे लक्ष द्यावे, अशी टीका केली आहे.

देगलुर शहरात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि अन्य नागरी सुविधांबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असताना सत्ताधारी नगरसेवकांच्या गोवा सहलीची चर्चा रंगू लागली आहे. विरोधी पक्षातील काही कार्यकर्त्यांनीही या प्रकरणावरून अप्रत्यक्ष टीका सुरू केली असून, समाजमाध्यमांवर नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओंबाबत संबंधित नगरसेवक किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सहल आणि त्यानंतर व्हायरल झालेले व्हिडिओ यामुळे देगलुरच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

संबंधित व्हिडिओ…

व्हिडिओ क्रमांक एक

 

व्हिडिओ क्रमांक दोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!