परभणी (प्रतिनिधी) – परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृसिंह) येथील एका तरुणाचा प्रेमसंबंधाच्या संशयातून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मनाठा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जून 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास निमटोक ते पिंगळी जाणाऱ्या रस्त्यावरील पिंगळी शेतशिवारात ही घटना घडली. संतोष अंगद वाघ (रा. पोखर्णी (नृसिंह), ता. परभणी) यांचा आरोपींनी दगडाने डोक्यात वार करून खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सुरज भजने (रा. बरड शेवाळा, ता. हदगाव), विलास लक्ष्मण आवळे (रा. टाकळी, ता. उमरखेड) आणि शंकर बिरगड (रा. कुरुंदा, ता. वसमत) यांचा समावेश आहे. आरोपी क्रमांक तीनच्या पत्नीशी मृत संतोष वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत मृताच्या नातेवाईक अंगद सुदामराव वाघ (वय 45, रा. पोचूर्णी (नृसिंह), ता. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोते मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 103 आणि 61(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास मनाठा पोलीस ठाण्याचे सपोनि चवळी करीत असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेमागील इतर कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
