नांदेड (प्रतिनिधी) -जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या शासकीय बांधकामाच्या उर्वरित बिलाची रक्कम देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चैतन्य नगर येथील रणवीर आर्ट दुकानात करण्यात आली. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंदराज शामराव दवणे (वय 37) हे ग्रामपंचायत पांगरी पहाड, ता. किनवट येथील ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी संत सेवालाल महाराज सांस्कृतिक सभागृहाचे सुमारे दहा लाख रुपयांचे बांधकाम पूर्ण केले होते. या कामाच्या बिलापैकी 9 लाख 128 रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने बिलाच्या पाच टक्के प्रमाणे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपीने तडजोडीअंती 40 हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली. त्यानंतर शनिवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने आरोपीला सध्या 25 हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितले असता, आरोपीने चैतन्य नगर येथील रणवीर आर्ट दुकानात बोलावून घेतले. सापळ्यादरम्यान आरोपीने 25 हजार रुपये दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले. तसेच उर्वरित 15 हजार रुपये ऑनलाईन पाठविल्यास लगेच धनादेश देतो, असे सांगून तक्रारदाराकडून स्कॅनरद्वारे 15 हजार रुपये ऑनलाईन जमा करून घेतले. त्यानंतर आरोपीने धनादेशावर स्वाक्षरी करून ग्रामपंचायतीचा शिक्का मारत तक्रारदाराला धनादेश दिला. यावेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून 25 हजार रुपयांची लाचेची रक्कम, सॅमसंग एस-25 अल्ट्रा मोबाईल, मराठवाडा ग्रामीण बँकेचे चेकबुक तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अधिकृत शिक्का जप्त करण्यात आला आहे. घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अनिता दिनकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी पर्यवेक्षण केले. Kanthak Suryatal Post Views: 864 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोभाचा शेवट आणि नैतिकतेचा धडा: ८५ लाखांच्या सोन्याच्या घोटाळ्यातील आदित्य सेनगावकर यांच्या जीवनाचा शोकांतिका प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; तिघांना अटक