लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांची धाड; 15 आरोपींवर कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड/लातूर, दि. 6 जून 2026 (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) श्री. शाहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात विशेष पथकाने मोठी कारवाई करत जुगार व मटका अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 लाख 5 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने विशेष पथकाला लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने 5 जून रोजी निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात सुरू असलेल्या दोन मटका बुकी केंद्रांवर छापा टाकला. या कारवाईत 24 हजार 320 रुपये रोख रक्कम, 43 हजार रुपयांचे सहा मोबाईल फोन आणि 48 हजार 600 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1 लाख 15 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 232/2026 व 233/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

याच मोहिमेदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरूर अनंतपाळ येथील हॉटेल युवराज बारच्या समोरील एका नूतन लॉनमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. येथे काही जण ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून 28 हजार 300 रुपये रोख, 61 हजार रुपयांचे आठ मोबाईल फोन आणि 3 लाख रुपयांच्या सहा मोटारसायकली असा एकूण 3 लाख 89 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 102/2026 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या या तिन्ही कारवायांमध्ये एकत्रितपणे 15 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 लाख 5 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. 91 50 100 100 या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना फोन किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती देता येणार आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन डीआयजी शाहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!